‘निसर्गापुढे हतबल झालो’, तौकते वादळामुळे अभिनेत्याचे मोठे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संजीवनी जाधव

अरबी समुद्रात तयार झालेल्या तौकते वादळाने राज्यात प्रचंड नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह पावसाचा अनेक ठिकाणी तडाका बसला आहे. या वादळाचा फटका जय मल्हार फेम देवदत्त नागे यालाही बसला आहे, याबाबात देवदत्त नागे याने दैनिक सामनाशी कथन केलेला अनुभव.

देवदत्त नागे हा मुळचा अलिबागचा आहे. सध्या लॉकडाऊनमुळे त्याचे शुटींग बंद असल्याने तो अलिबागला त्याच्या घरी आला होता. तौकते वादळाचा या अभिनेत्यालाही भयाण अनुभव आला आहे. यात त्यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. तौकते वादळ होऊन गेले मात्र गेले चार-पाच दिवस साफसफाई करत आहेत. या वादळाचा अनुभव सांगताना तो म्हणतो, मागच्यावर्षी याच दरम्यान चक्रीवादळ आले होते. तो अनुभव फार विचित्र होता. त्यात आमची फार वाताहत झाली होती आणि तो पहिलाच अनुभव होता. मुंबईकरांनी जो तौकते वादळाचा अनुभव घेतला आहे, तो आम्ही गेल्यावर्षी अनुभवला होता. मात्र यावेळी आम्ही सावध होतो. सुदैवाने घरावर काही पडलं नाहीय. मागच्या वादळात छपरावर आंब्याचे झाड पडले होते. त्यामुळे यावेळी थोडी काळजी घेत घरावर येणाऱ्या फांद्या तोडून घेतल्या होत्या. त्यामुळे घराचं नुकसान झाले नाही. मात्र झाडांचे, घराशेजारी बांधलेले कम्पाऊंडचे प्रचंड नुकसान झाल्याचे त्याने सांगितले.

पुढे तो म्हणतो, माझ्या खोलीच्या एका बाजुला काचा आहेत. त्या काचांवर झाडे आदळतात की काय याची भिती वाटत होती. गेल्यावर्षी वादळाचा फटका बसल्याने सतर्क होतो. पण निसर्गापुढे कोणाचेच काही चालत नाही. झाडं अक्षरश: जोरदार हलत होती की कधी पडतील याचा नेम नव्हता. आंब्यांचा अक्षरशा सडाच पडला होता. वाऱ्यासह पाऊस एवढा होता की टेरेसवरुन बघायचे, खाली येऊन बघायचे कुठून पाणी गळतय का असं चाललं होते. खूप धावपळ झाली होती.

तीन-चार रात्र झोपलोच नाही

जेव्हा कळलं असं वादळ येत आहे, तेव्हा आधीच तयारी ठेवली होती. भिती होती, तेवढेच हतबल झालो होतो. मागच्यावेळी जे काही झाले ते तीन-चार तासातच झालं. मात्र तौकते वादळाच्या फटक्यामुळे तीन दिवस वीज नव्हती, पाणी नव्हते. कसेतरी मॅनेज करत होतो. अलिबागमध्ये कुठेच वीज नव्हती. जनरेटर किती सपोर्ट करणार, काही करून फक्त मोबाईल चार्ज ठेवायचो. पाण्याचा साठा संपला होता. कधी एकदा वीज येते आणि आम्ही पाणी भरतो ते बघत होतो. यावेळी वारा थांबायचे नावच घेत नव्हता. आम्ही तीन-चार रात्र झोपलोच नाही. सतत दडपण यायच. रात्रीचे काही कळायचे नाही. मोबाईल आणि टॉर्च सतत चालू ठेवायचो. कारण काळोखात त्याचाच आधार होता.

निसर्गाचे रौद्ररुप पाहिले

नारळाच्या झाडांच्या झावळ्या पडल्या आहेत, झाडं उन्मळून पडली आहे, आंब्यांचा सडा झाला आहे, फांद्या तुटलेल्या आहेत. आमच्यासकट सगळ्यांकडेच नारळाची झाडं आहेत. नारळ भरपूर पडले आहेत. अजूनपर्यंत गेले तीन – चार दिवस आम्ही साफसफाईच करतोय. कम्पाऊंडचे नुकसान झाले आहे. वाऱ्याने बऱ्याच गोष्टी उडून इथे आल्या आहेत. बाकीचं सगळं ठिक असतं. मात्र निसर्गाचा दडपण भयंकर असतं. जेवढा तो प्रेमळ तितकाच तो रौद्र असतो. त्यामुळे त्याची जास्त भिती वाटते. अलिबागमध्ये खूप लोकांचे नुकसान झाले. बऱ्याचशा लोकांचे आंबा, नारळ, सुपारी या उत्पन्नाचे प्रचंड नुकसान झाले आहे. आपणच निसर्गाच ऱ्हास करतोय असं वाटायला लागलेय. त्यामुळे अशा गोष्टी होतायत. त्यामुळे काही करुन निसर्ग शाबूत ठेवणे गरजेचे आहे.