
कोरोनाच्या दुसऱया लाटेत रुग्णांना मोठय़ा प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासताना दिसत असून रुग्ण दगावण्याच्या घटनांत वाढ होत आहे. बरेच प्रयत्न करूनही ऑक्सिजन सिलिंडर मिळत नसल्याने पानिपतमधील एका युवकाने वैतागून शेतातील झाडाखाली आश्रय घेतला. दहा दिवसांत त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊन तो कोरोनातून ठणठणीत बरा झाला.
हरयाणातील पानिपत जिल्ह्यातील नंगला गावाचा रहिवासी असणाऱया प्रदीप सिंह या युवकाला कोरोनाची लागण झाली. रुग्णालयांची अवस्था पाहून त्याने घरातच विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात छातीत दुखू लागले, शरीरातील प्राणवायूची पातळी खालावल्याने श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याला श्वास घेण्यासही अडचण येऊ लागली.
ऑक्सिजनची पातळी 80 पर्यंत घसरल्यावर प्रदीपच्या घरच्यांनी त्याला ऑक्सिजन सिलिंडर किंवा ऑक्सिजन बेड मिळविण्यासाठी धावाधाव सुरू केली, मात्र काही उपयोग झाला नाही. ऑक्सिजन सिलिंडर न मिळाल्याने आता जे होईल ते होईल अशा विचाराने प्रदीप याने वैतागून शेतात एका झाडाखाली आश्रय घेतला.
तीन दिवसांत त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी पूर्ववत होण्यास सुरुवात झाली. हळूहळू त्याच्या छातीतील वेदनादेखील कमी झाल्या. श्वास घेण्यातील अडचणी दूर झाल्याने त्याचा आत्मविश्वास वाढला. पुढील 10 दिवस तो दररोज 8 ते 10 तास झाडाखाली बसून असायचा. जेवणदेखील तो तिथेच घ्यायचा. दहा दिवसांनी कोरोना चाचणी केली असता त्याचा अहवाल निगेटिव्ह आला.




























































