
नाकाबंदीदरम्यान पोलिसांसोबत तीन पायांवर उभा राहणाऱ्या ट्राय पॉड राजाची अभिनेता जॉन अब्राहिम याला भुरळ पडली आहे. आपल्या सर्व शक्तीने शहराची सेवा करत पुण्यातील तीन पायांचा राजा (श्वान) कायम दक्ष असल्याचे ट्वीट जॉनने केले आहे. त्यामुळे पुणे पोलिसांसोबत असलेला ट्राय पॉड राजा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी काही दिवसांपूर्वी पोलिसांसोबत कायम दक्ष असणाऱ्या तीन पायाचा कुत्रा रात्रदिंवस नाकाबंदीदरम्यान हजर असल्याचे ट्वीट केले होते. त्याच ट्वीटला अभिनेता जॉन अब्राहिम याने रिट्वीट करीत ट्रायपॉड राजाचे कौतुक केले आहे. आपल्या सर्व शक्तीने शहराची सेवा करत पुण्यातील तीन पायांचा राजा कायम दक्ष असल्याचे ट्वीट त्याने केले आहे. बालगंधर्व चौकीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत ट्राय पॉड (तीन पायावर) राजा पोलिसांच्या दिमतीला कायम आहे.
कोरोना कालावधीतही नाकाबंदीदरम्यान राजा दिवसरात्र पोलिसांसोबत असल्याचे दिसून आले आहे. कर्मचाऱ्यांकडून डब्यातील भाकरी, बिस्किट असे पदार्थ राजाला नित्यनियमाने खाऊ घातले जात आहेत. त्यामुळे राजाकडूनही इमानेइतबारे नाकाबंदीसाठी उभे राहून उपकाराची परतफेड केली जात आहे.


























































