लेख – कोरोना वर्षाची चांगली बाजू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. विजय पांढरीपांडे

एरवी आपण फार कॅज्युअल होतो. निष्काळजी होतो. कोरोना संकटामुळे आता आपण जागरूक झालो. समंजस झालो. आधी फक्त स्वतःचाच विचार होता. आता इतरांचा विचार करायला लागलो. आपल्यापेक्षाही दुःखी लोक आहेत, संकट आपल्या एकटय़ावर आलेले नाही, सगळे जगच एका महान संकटात अडकले आहे, त्यामुळे आपलेच रडगाणे गाण्यात अर्थ नाही, हे असे खूप काही आपण कोरोनामुळेच शिकलो. ही केवढी मोठी जमेची बाजू. त्यासाठी परमेश्वराचे आभार मानायला हवेत. देवळातला देवही सध्या ऑनलाईन आहे. रिकामा आहे. ऐकेल तो आपले!

कोरोनाच्या संकटाला वर्ष पूर्ण झाले आहे. संपूर्ण जगाला एक आगळावेगळा अनुभव, हादरा देणाऱ्या या विषाणूमुळे जो हाहाकार मजला, त्रास झाला, आर्थिक शैक्षणिक नुकसान झाले त्यावर बरेच लिहून झाले, चर्चा झाली. पण या कोरोनाची जमेची बाजूदेखील आहे. त्याचे काही फायदेही आहेत. त्या चांगल्या बाजूचादेखील विचार व्हायला हवा.

कोरोनामुळे सगळे व्यवहार ठप्प झाले. लॉक डाऊनमुळे लोक घरात अडकून बसले. दळणवळण बंद झाले. त्यामुळे डिझेल-पेट्रोलची कितीतरी बचत झाली.  प्रदूषण कमी झाले. ऊर्जेची बचत झाली. कार्यालयातली विजेची बचत झाली. शाळा-कॉलेज, विद्यापीठ बंद असल्याने कागदाची बचत झाली. सगळे व्यवहार इलेक्ट्रॉनिक माध्यमातून झाल्यामुळे शाई, फाईल्स, स्टेशनरी कागद याचा वापर कमी झाला. अप्रत्यक्षपणे पर्यावरणाचा फायदा झाला. एरवी शाळा-कॉलेजची परीक्षा, प्रश्न-उत्तरपत्रिका यावर कितीतरी खर्च होतो. तो वाचला.

आपली अनावश्यक खरेदी कमी झाली. एरवी उठसूठ मॉलमध्ये जाणे, कपडे, जोडे, प्रसाधने अशा कितीतरी वस्तू गरज असो वा नसो, आपण खरेदी करीत होतो. कपाटे भरीत होतो. यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले असेल पण सामान्य नागरिकांना फायदाच झाला.

अनेक मल्टी नॅशनल आयटी कंपन्यांचे कर्मचारी घरून काम करायला लागले. त्यामुळे त्यांच्या गगनचुंबी एसी इमारती ओस पडल्या. ते मोठमोठाले कॅम्पस फारसे गरजेचे नाहीत हेही समजले. अनेक देशांत अशा इमारतींचा उपयोग रहिवाशी कॉलनीसाठी करणार असल्याचे कळते. या इमारतीसाठी कोटय़वधी रुपयांचा खर्च झाला. तेवढी जमीन व्यापली. शिवाय कॅम्पसच्या देखभालीसाठी प्रचंड खर्च. वीज-पाणी हा खर्च वाचला. शिवाय कर्मचाऱयांचा प्रवासाचा वेळ, इंधन खर्च वाचला तो वेगळाच. ही बचत संपूर्ण देशात करोडो रुपयांच्या घरात असणार.

या काळात आपण सर्व घरात एकत्र राहिलो. एरवी छोटी मुले शाळेतून आल्यावर आईवडिलांची वाट बघत बसायची. आता सगळेच घरी. चोवीस तास सहवास. बायको नवऱ्याची वाट बघते आहे, नवरा बायकोची वाट बघतोय, अन्न गार होतेय, सगळे आपापल्या सवडीने जेवताहेत हे टळले. आता चोवीस तास एकमेकांची तोंडे पाहणे सहजसुलभ झाले. त्यातून वेगळे प्रश्न निर्माण झाले हे खरे. आता मुलांना कधी एकदाचे शाळा-कॉलेज सुरू होतात असे झालेय. नवरा-बायको यांनाही कधी ऑफिसला जातो, मित्र-मैत्रिणींना भेटतो असे झाले. या सगळ्याचे महत्त्व कळले.

माणसाच्या बौद्धिक अहंकाराला वेसण घातली या कोरोनाने. जगात अनेक प्रश्न आहेत ज्यावर तडकाफडकी,  सहजसोपे उत्तर शोधणे कठीणच नव्हे तर असंभव आहे हा साक्षात्कार झाला माणसाला. एरवी चंद्र-मंगळावर जाऊन पोहोचलेले विज्ञान, रडार, मिसाईल्स, साटेलाईट, यामागचे अत्याधुनिक तंत्रज्ञान या सूक्ष्म जिवाणूंच्या प्रभावापुढे हतबल झाले. निष्प्रभ ठरले. विषाणू आला कुठून, त्याचा प्रभाव किती, नेमका धोका किती, कुणाला, त्यासाठी उपाययोजना काय, दक्षता काय घ्यायची, हे सगळे निर्णय घेताना डॉक्टर,  शास्त्रज्ञ, अधिकारी, मंत्री, राज्यकर्ते सगळ्यांची तारांबळ उडाली. निर्णय अंगलट येण्याची प्रत्येकाला भीती वाटू लागली. एरवी तडकाफडकी धडाडीने निर्णय घेणारे अधिकारी, मंत्री, बुद्धिवान या वेळेस निष्प्रभ ठरले. त्यांची कुवत दिसून आली. एकूणच आपली मर्यादा आपल्याला कळली. हाही एक फायदाच.

प्रवासात कपात झाल्याने अनेक कार्यालयांत टीएडीएच्या खर्चात लाखोंची बचत झाली. या सर्व मीटिंग घरी बसूनही घेता येतात, निर्णय घेता येतात हे सिद्ध झाले. पूर्वी कितीतरी परिसंवाद व्हायचे. नॅशनल, इंटरनॅशनल, सेमिनार्स, वर्कशॉप व्हायचे. त्यासाठी महागडे हॉटेल्स, तिथला राहण्याचा, खाण्या-पिण्याचा लाखो रुपयांचा खर्च. त्याचे फलित काय हा भाग वेगळा. पण आता हेच आभासी पद्धतीने कमी खर्चात शक्य झाले.

आपली आरोग्य सेवा अशा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यास किती असमर्थ,  तुटपुंजी आहे हेही कळले. अनेक बाबतीत सरकारी धोरणे बदलणे गरजेचे आहे, आपले नियोजन चुकीचे आहे, आपले भविष्यासंबंधीचे अंदाज कसे चुकीचे आहेत हेही सिद्ध झाले. एका देशातलेच नव्हे तर सर्वच देशांतील सरकारे, शासन यंत्रणा यांच्या निर्णय क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. अमूक एक देश महासत्ता, सुसंपन्न, सर्वश्रेष्ठ असे काही नाही. उलट सर्वच देश एकमेकांवर अवलंबून आहेत, आशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी परस्पर सहकार्य गरजेचे आहे हेही आपण शिकलो. कुणीच स्वतःला अतिशहाणे समजू नये, आपण एकाच बुडत्या बोटीचे प्रवाशी आहोत, हे कोरोनाने आपल्याला ठणकावून सांगितले.

माणुसकीचे वेगळे दर्शन गेल्या वर्षात आपल्याला झाले. काही मोजके अपवाद वगळले तर माणसे माणसांच्या मदतीसाठी धावून पुढे आलीत. जे काही करता येणे शक्य होते ते त्यांनी चांगूलपणाने केले. मोलमजुरांचा प्रश्न असो की स्थलांतरित कामगारांचा, सगळे आपापल्या परीने मदतीचा हात घेऊन पुढे आले. स्पर्शाने शक्य नसेल तरी शब्दांनी आधार देणे, इंटरनेट, सोशल मीडियामुळे शक्य झाले. इंटरनेट तर या काळात फार मोठे वरदान ठरले. ऑनलाईन शिक्षण अडीअडचणीवर मात करून शक्य झाले. काही ऍप्समुळे आरोग्य यंत्रणेला घरोघरी पोहोचणे शक्य झाले. या वर्षात नात्यांची पारख झाली. कोण आपला, कोण परका, कोण जवळचे, कोण दूरचे हे अप्रत्यक्षपणे समजले. मुलेही शहाणी झाली. एकदम प्रौढ झाली. सर्वांना स्वच्छतेचे महत्त्व लक्षात आले. एखादी छोटीशी चूकदेखील सर्वांसाठी कशी घातक ठरू शकते ही जाण आली.  एरवी आपण फार कॅज्युअल होतो. निष्काळजी होतो. कोरोना संकटामुळे आता आपण जागरूक झालो. समंजस झालो. आधी फक्त स्वतःचाच विचार होता. आता इतरांचा विचार करायला लागलो. आपल्यापेक्षाही दुःखी लोक आहेत, संकट आपल्या एकटय़ावर आलेले नाही, सगळे जगच एका महान संकटात अडकले आहे, त्यामुळे आपलेच रडगाणे गाण्यात अर्थ नाही, हे असे खूप काही आपण कोरोनामुळेच शिकलो. ही केवढी मोठी जमेची बाजू. त्यासाठी परमेश्वराचे आभार मानायला हवेत. देवळातला देवही सध्या ऑनलाईन आहे. रिकामा आहे. ऐकेल तो आपले!