पार्थो दासगुप्तांना जामीन कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीआरपी घोटाळाप्रकरणी जामीन देण्यात आलेल्या आरोपी पार्थो दासगुप्ता यांना हायकोर्टाने दिलासा दिला. न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी जामीन कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पार्थो दासगुप्ताला 8 आठवडय़ांची अखेरची मुदतवाढ दिली आहे. अर्णब गोस्वामी याच्या ‘रिपब्लिक टीव्ही’च्या दर्शकांची संख्या वाढवण्यासाठी लाच स्वीकारत टीआरपी घोटाळा करणाऱया बार्कचे माजी सीईओ पार्थो दास गुप्ता यांना मुंबई क्राइम ब्रँचकडून 24 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. 2 मार्च रोजी हायकोर्टाने पार्थो दासगुप्ताचा जामीन अर्ज मंजूर केला. त्यावेळी उच्च न्यायालयाने दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यासह तेवढय़ाच रकमेचे दोन हमीदार दाखल करण्याचे आदेश देत कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सहा आठवडय़ांची मुदत दिली होती. या मुदतीत हमीदारांच्या कागदपत्रांची पूर्तता करता न आल्याने आणखी मुदतवाढ द्यावी अशी विनंती करणारा अर्ज पार्थोच्या वतीने हायकोर्टात करण्यात आला. या अर्जावर आज न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली.