
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर चंदन उटीतून श्रीचे भव्य नरसिंह अवतारातील वैभवी रूप डॉ. अभिजित धोंडफळे आणि सहकारी यांनी परिश्रमपूर्वक साकारले. श्रीचे वैभवी रूप पाहण्यास आळंदी देवस्थानने भाविकांसाठी थेट प्रक्षेपण केले होते. त्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोरोंना प्रादुर्भाव असल्याने मंदिर भाविकांना दर्शनास बंद ठेवण्यात आले आहे. आळंदीत श्री नरसिंह जन्मोत्सव श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मठातदेखील विविध धार्मिक कार्यक्रम झाले. परंपरेने श्री स्वामी महाराज यांचे संजीवन समाधीवर श्रीक्षेत्रपाध्ये श्रींचे पुजारी माजी नगराध्यक्ष सुरेश गांधी, सुधीर गांधी, नितीन गांधी, मुकुंद गांधी परिवाराने परिश्रमपूर्वक श्रींची वैभवी व लक्षवेधी चंदनउटी श्री नृसिंह अवतार साकारली.
नृसिंव्ह सरस्वती स्वामी महाराज मठ आणि माऊली मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत श्रीचे समाधीवर चंदन उटी लेप लावण्यास चैत्रात सुरुवात होते. नृसिंव्ह जयंतीनिमित्त श्रीचे संजीवन समाधीवर विविध लक्षवेधी वस्त्रालंकार वापरून स्वामींचे मठात श्रीचे वैभवी रूप श्रीक्षेत्रापाध्ये श्रीचे पुजारी सुरेश गांधी,सुधीर गांधी,नितीन गांधी परिवाराने चंदनउटीतून परिश्रमपूर्वक साकारले. स्वामी महाराज मठ येथे श्री नृसिंह सरस्वती स्वामीं महाराज संजीवन समाधीवर गांधी परिवाराने चंदन उटी तील वैभवी रूप साकारत पूजा बांधली. विविध वस्त्रालंकार, आभूषणे आणि पुष्प सजावट करीत श्रीचे रूप लक्षवेधी सजले.
व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी संस्थांनच्या प्रथेप्रमाणे मंदिरात नृसिंह जयंतीनिमित्त योग्य नियोजन केले. नृसिंह जयंतीनिमित्त माऊली मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत जन्मोत्सव उत्साहात करण्यात आला. यावेळी वारकरी शिक्षण संस्थेचे वतीने ह.भ.प. उमेश महाराज दशरथे यांचे जन्मोत्सवावर आधारित कीर्तन सेवा झाली.
परंपरेने मंदिरात प्रथम घंटानाद, काकडा, श्रींना पवमान अभिषेक, दुधारती झाली. श्रीनृसिंह जन्मोत्सवानिमित्त श्रीना वैभवी पोशाख करण्यात आला. जन्मोत्सव कीर्तन, आरती, महानैवेद्य, प्रसाद वाटप, मानकरी यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात आला. चैत्र शुद्ध पाडव्यापासून मृग नक्षत्रापर्यंत माऊलींच्या संजीवन समाधीस नियमित चंदन उटीलेप लावण्यात येतो. गुढीपाडवा, रामनवमी, अक्षय तृतीया, नरसिंह जयंती आदी सणांप्रसंगी समाधीस चंदन लेपात विविध अवतार रूपातील पूजा बांधण्यात येते. माऊली मंदिरात श्रीचे दर्शनास भाविकांची गर्दी यावर्षी कोरोंना प्रादुर्भाव असल्याने झाली नाही. श्रीनां धुपारती झाल्या नंतर मानकरी संतोष मोझे यांचे वतीने हरीजागर झाला.



























































