
तोक्ते चक्रीवादळात महावितरणला मोठा फटका बसून जिल्ह्यातील वीजप्रवाह खंडित झाला होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी युध्दपातळीवर काम करत हा विद्युतपुरवठा सुरळीत केला. त्यामुळे देवरुख परिसरात काही ठिकाणी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देत त्यांचा सत्कार करण्यात आला. वीजपुरवठा खंडित झालेल्या 1239 पैकी 1238 गावात महावितरणने वीजपुरवठा पुन्हा सुरु केला आहे.
चक्रीवादळात 1239 गावात वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यापैकी 1238 गावात वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. अद्याप एका गावामध्ये वीजपुरवठा सुरु झालेला नाही. बाधित 55 वीज उपकेंद्रांपैकी सर्व उपकेंद्रे सुरु करण्यात आली आहेत. 7548 ट्रान्सफॉर्मरपैकी 7540 ट्रान्सफॉर्मर सुरु करण्यात आले आहेत. 5 लाख 54 हजार 921 वीज ग्राहकांपैकी 5 लाख 52 हजार 815 वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. अद्याप 2106 वीज ग्राहकांचा वीज पुरवठा सुरु करणे बाकी आहे. उच्च वीजदाबाचे 418 पोल उभे करण्यात आले असून अद्याप 100 पोल उभे करणे बाकी आहे. कमी वीजदाबाचे 885 पोल उभे करण्यात आले असून अद्याप 525 पोल उभे करणे बाकी आहे. महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर, कार्यकारी अभियंता रामलिंग बेले, शिवतारे, कैलास लवेकर यांच्यासह संपूर्ण कर्मचारीवर्ग युध्दपातळीवर काम करत आहे़.






























































