
लातूरातील सिध्देश्वर मंदिराजवळ दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाचजणांच्या टोळीतील तिघांना पकडण्यात पोलीसांना यश आले. या तिघांकडून एक तलवार, लोखंडी रॉड, मिरची पावडर जप्त करण्यात आली आहे.
सिध्देश्वर मंदिरानजीक कंपाऊंडजवळ पाचजण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर उपअधिक्षक यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी व गांधी चौक पोलीस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांची चाहुल लागताच दोघेजण अंधाराचा फायदा घेत पळून गेले. मात्र, तिघांना पकडण्यात पोलीसांना यश आले. त्यात अजिंक्य निळकंठ मुळे (वय 24, रा. उत्का ता. औसा, सध्या रा. जुना औसा रोड), विश्वजित अभिमन्यू देवकत्ते (वय 20, रा. कातपूर), गणेश महादेव माने (वय 19, रा. खोरे गल्ली) यांचा अटक केलेल्यांमध्ये समावेश आहे.
अजिंक्य मुळे याच्याकडून तलवार, विश्वजित देवकत्ते याच्याकडून एक लोखंडी रॉड तर गणेश माने याच्याकडून मिरची पावडर जप्त करण्यात आली. पळून गेलेल्यांमध्ये सुनिल विठ्ठल भोसले (रा. राजे शिवाजी नगर, वसवाडी) व निलेश काळे (रा. शिरुर अनंतपाळ, सध्या रा. खर्डेकर स्टॉप) यांचा समावेश आहे. गांधी चौक पोलीस ठाण्यात या प्रकरणी पाचजणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनिल भोसले व निलेश काळे या दोघांचा शोधात गेलेल्या पोलिसांच्या पथकाला सुनिल भोसले चोरीच्या मोटारसायकलसह सापडला. लातूर शहरातील खाजगी कोचिंग क्लासेस एरिया, दयानंद कॉलेज गेट, प्रकाश नगर येथे दुकानाचे शटरचे कुलूप तोडून रोख रक्कम व मोबाईल चोरी केल्याची कबुली त्याने दिली. यासाठी वहिद शेख, आर.बी. ढगे, पोलीस कर्मचारी कवाळे, शिंदे, बेसके यांनी परिश्रम घेतले.






























































