कोविड सेंटरमधील नर्सचा ब्रदरने केला विनयभंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
molestation-1

लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटरमधील एका नर्ससोबत काम करणाऱ्या ब्रदरने तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. तो दीड महिन्यापासून तिचा पाठलाग करून त्रास देत होता. त्यानंतर मंगळवारी रात्री तो तिच्या घरात घुसला आणि तिचा विनयभंग केला. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात ब्रदरवर विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पीडित नर्स सध्या लोखंडी सावरगावच्या रुग्णालयात कामावर आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दीड महिन्यापासून त्या राहत असलेल्या रूमचा रात्री अपरात्री कोणीतरी दरवाजा ठोठावून जात असे. त्यांनी पाळत ठेवली असता त्यांच्यासोबत ब्रदर म्हणून काम करणारा अर्जुन अनंत फड (रा. दौंडवाडी, ता. परळी) हा दरवाजा ठोठावताना दिसून आला. दुसऱ्या दिवशी त्यांनी अर्जुनला जाब विचारला असता त्याने तुमच्यासोबत लग्न करायचे आहे, असे सांगितले

पीडितेने त्यास आपण विवाहित असल्याचे सांगितले. तसेच यापुढे त्रास देऊ नको, असे बजावले. मात्र, अर्जुन त्यांचा सतत पाठलाग करत होता. तसेच काहीतरी कारण काढून बोलण्याचा प्रयत्न करून त्रास देत होता. मंगळवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास पीडिता ड्युटीवरून घरी परतली असता अर्जुनने तिच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला. पीडितेने आरडाओरडा करण्याची धमकी दिल्यावर अर्जुनने तिला ठार मारण्याची धमकी दिली आणि निघून गेला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून अर्जुन फड याच्यावर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पीएसआय मोनाली पवार करत आहेत. दरम्यान, आरोपी फरार झाला असून अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही.