स्मरण स्वातंत्र्यवीर सावरकरांचे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विलास पंढरी

स्वातंत्र्यवीर सावरकरांची दूरदृष्टी अशी होती की, ते 100 वर्षांपुढील विचार करीत होते. त्यांचे विचार अमलात न आल्याने या राष्ट्राचे अतोनात नुकसान  झाले आहे. पाकिस्तानची निर्मिती देशाला कायमची डोकेदुखी होऊन बसेल, असे सावरकर म्हणाले होते. गेल्या सत्तर वर्षांत थेट युद्धाशिवाय आपले जवान व नागरिक मिळून ऐंशी हजारांपेक्षा अधिक लोक पाकपुरस्कृत दहशतवादात मारले गेले आहेत, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अंदमानमुक्ती वर्षाची शताब्दी आणि 28 मे रोजी असलेली जयंती यानिमित्त हा लेख.

ब्रिटिशांच्या तावडीतून सुटका होणार नाही हे लक्षात घेऊन सावरकरांनी फ्रान्सच्या किनाऱ्यावरील मार्सेलीस बंदरात बोटीतून जगप्रसिद्ध धाडसी उडी मारली. आंतरराष्ट्रीय नियमानुसार दुसऱ्या राष्ट्राच्या भूमीवर आश्रय घेतलेल्याला पकडता येत नाही, या नियमाचा आधार घेत हा प्लॅन त्यांनी आखला होता, पण दुर्दैवाने व फ्रेंच पोलिसांच्या भ्रष्टाचारामुळे ते पकडले गेले. तेंव्हा ब्रिटिश छळ करणारच हे गृहीत धरून मनाला धैर्य देण्यासाठी सावरकरांनी आत्मबल वाढविण्यासाठी पुढील कविता लिहिली.

अनादि मी, अनंत मी, अवधी मी,

मारिल रिपु,जगती असा कवन जन्मला.

जाळि मजसी ना खड्ग छेदितो

भिऊनि मला भ्याड मृत्यू पळत सुटतो

या मृत्यूला आव्हान देणाऱ्या काव्यपंक्ती वाचल्यावर  भगवद्गीतेतील ‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः!’ या श्लोकाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मी चिरंतन आहे, अंतहीन आहे, वध न होणारा आहे, मला मारेल असा शत्रू जगात कोण जन्मला आहे? असा या कवितेचा अर्थ. मृत्यूची भीती सावरकरांना कधीच नव्हती. त्यांनी केलेले लेखन, दिलेली ऊर्जा आणि त्यांची राष्ट्रभक्ती कवितेत लिहिल्याप्रमाणे अनंतच आहे. जो जन्माला आला तो कधी तरी जाणारच, पण  स्वतःच्या मर्जीने वयाच्या 82 व्या वर्षी प्रायोपवेशन किंवा जैन धर्मातील संथारा व्रताप्रमाणे औषधपाणी बंद करीत सावरकरांनी या जगाचा निरोप घेतला तो दिवस होता 26 फेब्रुवारी 1966. मृत्यू सतत त्यांचा पाठलाग करीत होता, पण ते हरले नाहीत. आपले कार्य संपल्यावर स्वतःहून मृत्यूला बोलावत इथेही त्यांनी शौर्य दाखवून दिले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची दूरदृष्टी अशी होती की, ते 100 वर्षांपुढील विचार करीत होते. त्यांचे विचार अमलात न आल्याने या राष्ट्राचे अतोनात नुकसान  झाले आहे. पाकिस्तानची निर्मिती देशाला कायमची डोकेदुखी होऊन बसेल, असे सावरकर म्हणाले होते. गेल्या सत्तर वर्षांत थेट युद्धाशिवाय आपले जवान व नागरिक मिळून ऐंशी हजारांपेक्षा अधिक लोक पाकपुरस्कृत दहशतवादात मारले गेले आहेत, पण आता लवकरच हे थांबेल. कारण सावरकरांना अपेक्षित असलेले कश्मीरचे 370 वें कलम आता रद्द झालेले आहे. 1947 मध्येच सावरकरांनी अणुबॉम्ब बनवायचा सल्ला दिला होता. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना हिंदुस्थानने 1974 मध्ये पहिल्यांदा पोखरणला अणुचाचणी केली. मात्र तेव्हा हिंदुस्थानने अण्वस्त्रनिर्मिती केली नव्हती किंवा स्वतःला अण्वस्त्रधारी देश म्हणून घोषितही केले नाही. त्यासाठी 24 वर्षांचा काळ जावा लागला. 1998 मध्ये केंद्रात सत्तांतर होऊन रालोआचे शासन आले. त्यानंतर केवळ दोन महिन्यांच्या आत तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी एक क्रांतिकारी निर्णय घेत पोखरणला दुसऱ्यांदा अणुचाचणी केली आणि हिंदुस्थानला ’अण्वस्त्रधारी देश’ म्हणून घोषित केले.

चीनपासून सतत सावध राहायला हवे असा सल्ला सावरकरांनी सरकारला दिला होता. ते  पूर्ण सत्य ठरले आहे. आपला हजारो चौरस किलोमीटर प्रदेश चीनने घशात घातला आहेच, पण सीमेवर सतत युद्धाची धमकी देतो आहे. कोरोना नामक एका महामारीने हिंदुस्थानसह गेले वर्षभर जगभर  हाहाकार माजविला असताना आपल्या उत्तर सीमेवर चीनने सैन्य उतरविल्याने प्रचंड थंडीत आपल्यालाही सैन्य खडे ठेवावे लागते आहे.

सावरकरांनी त्यांच्या साहित्यातून, भाषणातून हिंदूंच्या म्हणजेच देशाच्या ऱहासाची कारणं सांगितली आणि काय करायला हवं हेही सांगितलं आहे. त्यांनी म्हटले होते की, हिंदू राजांनी युद्ध जिंकल्यावरही नेहमी सहिष्णुता दाखवली, जी हिंदू धर्माला मारक ठरली. याउलट मुस्लिम राज्यकर्त्यांनी बळजबरीने धर्मांतर, स्त्रियांवर अत्याचार, देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली, आपली लोकसंख्या वाढवली. हिंदू राजांनी मुसलमानांवर केलेल्या कारवाया या फारच कमी होत्या. त्यामुळे त्यांची भीड चेपली गेली व त्यांचे धाडस वाढत गेले. केरळमधील हिंदूंना बाटवून आपण हिंदुस्थान लवकरच ख्रिस्ती करू असा मनसुबा त्यावेळच्या तेथील ख्रिश्चन धर्मगुरूने चर्चला कळवला व त्याची अंमलबजावणीही केली. आज केरळमध्ये वाढलेल्या ख्रिश्चन संख्येच्या मुळाशी याकडे झालेले हिंदूंचे दुर्लक्ष हे कारण आहे. मुस्लिम राजकर्त्यांनी हिंदूवर अत्याचार केले तेव्हा हिंदू राज्यकर्त्यांनी त्यास परतवून लावले, पण ती बाजू मुस्लिमांवर पलटविणारे हिंदू राज्यकर्ते तुरळक होते. हिंदूंना एकत्र येण्यासाठी हिंदू कुणाला म्हणावे याची चपखल व्याख्या सावरकरांनी केली आहे. ते म्हणतात-

आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका

पितृभूः पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृतः

याचा अर्थ

“हिंदुस्थान ही ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे तो हिंदू. पितृभू म्हणजे पितर किंवा वाडवडिलांची भूमी, म्हणून मातृभूऐवजी पितृभू शब्द सावरकरांनी वापरला आहे. हिंदुस्थानी उपखंडात राहणारा हा हिंदूच म्हणून ओळखला गेला पाहिजे, अशी  सावरकरांची  ठाम भूमिका होती. पाकिस्तान आणि चीनबाबत सावरकरांनी धोक्याचा इशारा दिलाच होता. त्यांना तोंड देण्यास  देश आता समर्थ झाला आहे.