वरळी दुर्घटनेतील खरात कुटुंबीयांना सरकारकडून चार लाखांची मदत; आदित्य ठाकरे यांच्याकडून सांत्वन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘तौकते’ चक्रीवादळात झाड अंगावर कोसळून  मृत्यू झालेल्या वरळी येथील संगीता खरात यांच्या कुटुंबीयांची आज पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट घेऊन सांत्वन केले. खरात कुटुंबीयांना राज्य सरकारकडून चार लाख रुपयांची आर्थिक मदतही यावेळी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते खरात कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आली.

कोकण किनाऱ्यावर धडकेलेल्या ‘तौकते’ चक्रीवादळाने 16 मे रोजी मुंबईच्या किनाऱ्यांवरही थैमान घातले. मुंबईत वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे 2263 झाडे-झाडाच्या फांद्या उन्मळून पडल्या. या वादळात वरळी येथील संगीता खरात यांच्या अंगावर झाड कोसळून त्यांचा मृत्यू झाला. संगीता खरात या धुणीभांडी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होत्या. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांची दोन मुले अनाथ झाली. या पार्श्वभूमीवर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी खरात कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. सरकार आपल्या पाठीशी असल्याचा धीर यावेळी त्यांनी खरात कुटुंबीयांना दिला. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना खासदार अरविंद सावंत, उपनेते सचिन अहिर, माजी आमदार सुनील शिंदे, विभागप्रमुख ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर, नगरसेवक अरविंद भोसले, संतोष खरात, अनुपमा परब, राजेश दुबे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.