शिवीगाळ केल्याचा जाब विचारला म्हणून तरुणाच्या डोक्यात वार करत केले जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवीगाळ करीत असल्याचा जाब विचारल्यामुळे टोळक्याने एकावर कोयत्याने वार करून त्याच्या कुटुंबाला मारहाण केल्याची घटना हडपसरमधील महमंदवाडीत घडली. याप्रकरणी नीलेश शहाजी एडके, मिलींद शहाजी एडके, वृक्षना एडके (सर्व रा. साठेनगर, महमंदवाडी रस्ता ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावेआहेत. लक्ष्मण धोडिंबा भंडारे (वय 55, रा. साठेनगर, महमंदवाडी ) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एडके आणि भंडारे एकाच परिसरात राहायला आहेत. दोन दिवसांपुर्वी लक्ष्मण यांचा मुलगा मद्यपान करून आल्यानंतर घरात भांडण करीत होता. त्यावेळी आरोपी निलेश आणि मिलिंद यांनी लक्ष्मण यांना विनाकारण शिवीगाळ केली. त्यामुळे सचिन भंडारे यांनी आरोपींकडे शिवीगाळ केल्याचा जाब विचारला. त्याचा राग आल्यामुळे आरोपींनी सचिनला मारहाण केली. त्यानंतर नीलेशने लक्ष्मण यांच्या डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर लक्ष्मण तक्रार देण्यासाठी पोलिस चौकीत गेले असता, आरोपींनी त्यांच्या घरावर दगड फेकून मारले आहेत. याप्रकरणी वानवडी पोलिस तपास करीत आहेत.