>>नवनाथ शिंदे
पुणे पोलिसांकडून नागरिकांच्या कामकाजाला कसा प्रतिसाद दिला जातो, यासंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आढावा घेतला. त्यांनी आयुक्तालयातील सेवा विभागातून एका अर्जदाराला सहज फोन करून पोलीस ठाण्यात तुम्हाला कशी वागणूक दिली, अशी विचारणा केली. मात्र, त्यांनी सहज केलेला फोन थेट एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला लागला. त्यामुळे तुमचे पद सांगितल्यामुळे पोलिसांनी तुम्हाला चांगली वागणूक दिली का, अशी गुगली टाकताच कार्यकर्त्याला हसू आवरले नाही.
पोलिसांच्या कामगिरीवर नागरिक समाधानी आहेत की नाही, याचा आढावा वळसे पाटील यांनी घेतला. सेवाप्रणाली कार्यालयातील समन्वय कर्मचारी पूजा भगत यांनी अर्जदार रमेश राऊत यांना फोन केला. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आपल्यासोबत बोलणार असल्याची माहिती त्यांनी अर्जदाराला दिली. त्यानंतर पाटील यांनी रमेश राऊत यांना पोलीस ठाण्यात कशासाठी गेला होता. तुम्हाला पोलिसांनी मदत केली का, अशी विचारणा केली. त्यानंतर राऊत यांनी व्हेरिफिकेशनसाठी मुंढवा पोलीस ठाण्यात गेलो होतो. त्याठिकाणी पोलिसांनी सन्मान दिला. सध्या व्हेरिफिकेशनचे कामकाज ऑनलाईनरित्या सुरू असल्याचे सांगितले.
तुमचे पद सांगितल्यामुळे पोलिसांनी काम केले का, अशी विचारणा करताच रमेश राऊत यांना हसू आवरले नाही. मात्र, त्यांनी पोलिसांच्या कामगिरीवर समाधानी असल्याचे गृहमंत्र्यांना सांगितले. सेवा विभागातील पोलीस उपनिरीक्षक गीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूजा भगत, स्वाती राऊत, शिल्पा गायकवाड, स्वाती पोमण, भाग्यश्री मेटकरी, सारिका कांबळे कार्यरत आहेत.


























































