एक कोटी 80 लाख लसींसाठी पालिकेचे सहा ‘सिस्टर सिटीं’ना साकडे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना लसींचा तुटवडा दूर करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने जागतिक स्तरावर लस मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये ग्लोबल टेंडर काढल्यानंतर आता सहा सिस्टर सिटींना एक कोटी 80 लाख कोरोना लसींचे डोस पुरवण्यासाठी विनंतीपत्रही पाठवले आहे. महापालिकेला हे डोस मिळाल्यास लसीकरण मोहिमेला वेग येणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

मुंबईत लसीकरण मोहीम 16 जानेवारीपासून सुरू झाली, मात्र लसींच्या अपुऱया पुरवठय़ामुळे लसीकरण मोहिमेला वारंवार ब्रेक लागत आहे. त्यामुळे पालिकेने लसींच्या पुरवठय़ासाठी ग्लोबल टेंडर काढले आहे. यासाठी आठ पंपन्यांनी स्वारस्य दाखवले असले तरी एका पंपनीने माघार घेतली आहे. त्यामुळे पालिकेने आता कोरोना लसींचे डोस मिळवण्यासाठी सिस्टर सिटींनाही पत्र लिहूनही विनंती केली आहे. यासाठी लागणारा निधीही पालिकेकडून दिला जाईल असेही पालिकेने आपल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, संबंधित शहरांशी मुंबई महानगरपालिकेचे जिव्हाळा-सौहार्दाचे संबंध असल्यामुळे लसींचा पुरवठा वाढून पालिकेच्या लसीकरण मोहिमेला वेग येईल, असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.

या सिस्टर सिटींना पत्र

पालिकेने लस पुरवठय़ासाठी विनंती केलेल्या सिस्टर सिटींमध्ये रशियाची पीटर्सबर्ग, अमेरिकेची न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, दक्षिण कोरियाची बुसान, जर्मनीची स्टुटगार्ड आणि जपानच्या योकोहोमा शहरांच्या महापौरांना पत्र लिहून लसींचा पुरवठा करावा अशी विनंती करण्यात आली आहे. यातील जपानच्या योकोहोमा शहराने लसींचा पुरवठा करणे शक्य नसल्याचे कळवले असून आर्थिक मदत करू असे आश्वासन दिले आहे.

सामाजिक, सांस्कृतिक, व्यावसायिक संबंधांमुळेच मदतीचे आवाहन

आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेचे देशातील अनेक पालिकांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. या शहरांना ‘सिस्टर सिटी’म्हटले जाते. या शहरांचे महापौर, महत्त्वाच्या पदांवरील अधिकारी मुंबई महापालिकेला भेटी देत असतात. यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, व्यावसायिक देवाणघेवाणही होते. या संबंधांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील लसींचा तुटवडा दूर करण्यासाठी ही पत्रे देण्यात आली आहेत.