
>> कर्नल अनिल आठल्ये (निवृत्त)
कोविड-19 नंतरच्या जगात जी शक्ती-समीकरणे आकार घेत आहेत, त्यात चीनच्या बाजूने कोण आहे? आर्थिकदृष्टय़ा दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर असलेला पाकिस्तान, इराण, उत्तर कोरिया आणि कदाचित तुर्कस्तान! आफ्रिकेतील काही देश सध्या चीनला पाठिंबा असल्याचे दर्शवीत असले तरी त्यामागे चिनी मॉडेलचे आकर्षण नसून आर्थिक अगतिकता हे कारण आहे. सक्षम मित्रदेशांअभावी चीन हा नाझी जर्मनीच्याच विनाशकारी रस्त्यावरून वाटचाल करीत आहे.
काळ आणि सागराची भरती कुणासाठी थांबत नाही. हिंदुस्थान कोविड-19 च्या भयावह अशा दुसऱया लाटेचा मुकाबला करीत असताना जागतिक घडामोडी वेगाने पुढे सरकतच आहेत. लष्करी आणि आर्थिक अशा दोन्ही स्तरांवर अमेरिका चीनशी दोन हात करेल, असे अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी अमेरिकी काँग्रेसमध्ये भाषण करतेवेळी स्पष्ट केले. डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे आपल्यावरील अमेरिकेचा दबाव कमी होईल हा चीनचा समज चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले. चीनला नियंत्रित करण्यासाठी अमेरिका आणि क्वॉड देशांसोबत (ऑस्ट्रेलिया, जपान आणि हिंदुस्थान) राहण्याचा निर्णय युरोपीय महासंघाने घेतला असल्यामुळे पुढील घडामोडी कशा असतील, याचे संकेत मिळत आहेत. पूर्वी अमेरिका आणि तत्कालीन सोव्हिएत संघराज्याच्या दरम्यान 1945-46 ते 1992 या कालावधीत शीतयुद्ध सुरू होते आणि सोव्हिएत संघराज्याच्या पतनाबरोबरच ते समाप्त झाले होते. त्या पार्श्वभूमीवर या नव्या शीतयुद्धाकडे जग औत्सुक्याने पाहत आहे.
अर्थात, असा विचार करणे खूपच ढोबळपणाचे ठरेल. त्या आणि या शीतयुद्धामध्ये काही साम्य स्थळे असली तरी काही मूलभूत फरकही आहेत. अमेरिकेच्या व्यक्तिगत स्वातंत्र्य, मुक्त बाजार आणि भांडवलशाहीच्या विरोधात सोव्हिएत संघराज्याने साम्यवादाच्या पर्यायाचे समर्थन केले होते. आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेत साम्राज्यवादाच्या विरोधात आणि स्वातंत्र्य आंदोलनांसाठी सोव्हिएत संघाने समर्थन दिल्यामुळे त्याचा प्रसार झाला होता. वैचारिक दृष्टिकोनांमुळे दोन्ही पक्षांना काही सहकारी आणि काही सहानुभूतीदार देश होते. अंतिमतः त्या शीतयुद्धाचा निर्णयही विचारधारांवर आधारित झाला आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱया ‘सॉफ्ट पॉवर’चा त्यात विजय झाला. अर्थातच टीव्ही, वॉशिंग मशीन, नवनवीन ब्रँडच्या मोटारी ही उत्तम जीवनशैलीची प्रतीके बनवून समोर आणणाऱया भांडवली प्रणालीच्या यशस्वीतेमुळे या लढय़ात जिंकण्यासाठी त्या विचारांना आर्थिक बळ लाभले होते. सोव्हिएत संघराज्याने कधीच मोटारींचे उत्पादन केले नाही आणि त्या देशाने उत्पादित केलेली ‘लाडा’ ही प्रमुख मोटारसुद्धा खिल्ली उडविण्याइतकी वाईट होती. चीनचे सर्वोच्च नेते शी जिनपिंग यांनी एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घ्यायला हवी ती अशी की, सोव्हिएत संघराज्याचे विघटन होईपर्यंत सर्वच शक्तींच्या बाबतीत तो देश अमेरिकेच्या बरोबरीने होता. लष्करी शक्ती, क्षेपणास्त्रs, अण्वस्त्रs यांच्या बाबतीत सोव्हिएत संघ आणि आताचा रशियासुद्धा अमेरिकेच्या बरोबरीने आहे.
नवीन शीतयुद्ध समजून घेण्यासाठी 1940 च्या दशकामधील घटनाक्रम हा 1960 किंवा 1970 च्या घटनाक्रमांपेक्षा अधिक मिळताजुळता ठरेल. चीनच्या बाजूने कोणताही वैचारिक आयाम मिळत नसल्यामुळे चीनचे डावपेच समजून घेताना विचारधारेच्या नव्हे, तर सत्तेच्या आणि राजकारणाच्या अंगाने समजून घ्यावे लागेल. चिनी कम्युनिस्ट पक्ष यावर्षी आपली शताब्दी साजरी करीत आहे. त्या निमित्ताने विचारधारेवर आधारलेल्या या पक्षाचे रूपांतर ‘बिग ब्रदर’च्या गुलामात कसे झाले, याचा धांडोळा घेणे इष्ट ठरेल. सोव्हिएत संघराज्याच्या पतनाच्या प्रक्रियेतून काही धागेदोरे आपल्याला मिळतात. तत्कालीन सोव्हिएत संघराज्यात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या शिक्षणावर आणि प्रगतीवर भर देण्यात आला होता आणि सामाजिक विज्ञानांना दाबून ठेवण्यात आले होते. कम्युनिस्ट विचारधारा हेच सर्वस्व बनविण्यात आले होते. एकाधिकारवादी देशांमध्ये सामाजिक शास्त्रs ही संशोधनाची साधने न बनता ‘प्रतिध्वनींचा कक्ष’ अशीच त्यांची स्थिती राहिली. सामाजिक विज्ञानांच्या क्षेत्रातील ही घसरण महत्त्वपूर्ण धोरणनिर्मितीच्या स्तरावर माहितीची उणीव निर्माण करते आणि केवळ प्रखर राष्ट्राभिमानाला जन्म देते.
ज्या कारणांमुळे सोव्हिएत संघराज्याचा अंत झाला, त्याच मार्गावरून चीनची वाटचाल सुरू आहे. आपल्या लोकसंख्येच्या आणि आर्थिक शक्तीच्या जोरावर जागतिक ताकद बनण्याचा चीनचा दावा चुकीचा ठरविण्याचा येथे हेतू नाही, परंतु नाझी जर्मनीचा अनुभव असे सांगतो की , जगावर अधिराज्य गाजविण्याचे स्वप्न बाळगण्यासाठी प्रखर राष्ट्रवादापेक्षा ‘सॉफ्ट पॉवर’ची अधिक गरज असते. शी जिनपिंग आणि शिनहुआ विद्यापीठातील पंडितांनी जर इतिहासाचा वस्तुनिष्ठ अभ्यास केला, तर चीनची आजची परिस्थिती हिटलरकालीन जर्मनीसारखी आहे हे त्यांना पटेल. 1940 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात जर्मनी हा जगातील औद्योगिक ताकद मानला जात होता. व्ही-1 आणि व्ही-2 रॉकेट्स, जेट इंजिन, रणगाडय़ांसाठी नाइट व्हिजन अशी जर्मनीची बरीच लष्करी सामग्री मित्रराष्ट्रांपेक्षा कितीतरी अत्याधुनिक होती. परंतु मित्रराष्ट्रांकडे युरोपातील ब्रिटन, फ्रान्स अशा देशांबरोबरच रशिया आणि अमेरिकाही होते, तर जर्मनीचा एकमेव मित्रदेश होता इटली. जर्मनी आणि जपानमधील समन्वयही अत्यल्प होता. त्यामुळे अर्थातच मित्रराष्ट्रांच्या एकत्रित ताकदीने जर्मनीचा पराभव केला.
कोविड-19 च्या नंतरच्या जगात जी शक्ती-समीकरणे आकार घेत आहेत, त्यात चीनच्या बाजूने कोण आहे? आर्थिकदृष्टय़ा दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर असलेला पाकिस्तान, इराण, उत्तर कोरिया आणि कदाचित तुर्कस्तान! आफ्रिकेतील काही देश सध्या चीनला पाठिंबा असल्याचे दर्शवीत असले तरी त्यामागे चिनी मॉडेलचे आकर्षण नसून आर्थिक अगतिकता हे कारण आहे. सक्षम मित्रदेशांअभावी चीन हा नाझी जर्मनीच्याच विनाशकारी रस्त्यावरून वाटचाल करीत आहे. चीनमधील आक्रमक राष्ट्रवाद आणि त्याच्यासमोर असलेली निसरडी वाट हा हिंदुस्थानसह अनेक देशांमधील सत्तावादी नेतेमंडळींसाठी महत्त्वाचा धडा आहे. सामाजिक विज्ञानांमध्ये संशोधनाचे स्वातंत्र्य आणि त्यातील बहुविधताच अंतिमतः राष्ट्राच्या हिताची असते. अगदी टीकाकारसुद्धा त्यांचे उद्दिष्ट काहीही असले तरी शासकाला विविध पर्यायांमधून योग्य निवड करण्याची प्रेरणा देत असतात.
नव्या शीतयुद्धात चीनला विरोध करणारी लोकशाही विचारधारा आहे आणि चीनकडे विचारधारा म्हणून देण्याजोगे काहीही नाही. चीन आणि त्याची धोरणे ही कोणत्याही सार्वभौमिक विचारधारेवर अवलंबून नसून ती राष्ट्रवादाने प्रेरित आहेत. चिनी लोकांना त्यांच्या संस्कृतीबद्दल अभिमान आहे; परंतु चिनी कम्युनिस्ट पक्षाने तो वांशिक गर्वाशी जोडून वेगळ्याच स्तरावर नेला आहे. चीन हे मध्य साम्राज्य असून पृथ्वीच्या केंद्रबिंदूची चिनी लोकांच्या मेंदूवर पकड आहे अशी ही धारणा आहे. वंशवादाबरोबरच चीनच्या प्रभुत्वाची आस राष्ट्रवादाच्या आधारावर उभी आहे. अशा प्रकारे नवीन शीतयुद्ध इतर कोणत्याही घडामोडींपेक्षा हिटलरच्या काळात जर्मनीमध्ये दिसून आलेल्या ‘उच्च वंशा’च्या संकल्पनेशी अधिक मिळते जुळते आहे. तत्कालीन जर्मनी आणि आजच्या चीनमध्ये बरीच साम्य स्थळे आहेत. नाझींनी ज्याप्रमाणे ज्यू लोकांचे शिरकाण केले, त्याच प्रकारे चीनमध्ये उईगर मुस्लिम आणि तिबेटी लोकांना लक्ष्य केले जात आहे. शी जिनपिंग यांच्या कार्यकाळात चीनमध्ये व्यक्तिवादही फोफावला आहे.
(लेखक संरक्षणतज्ञ आहेत.)





























































