
>> डॉ. ज्योती धर्माधिकारी
हिंदुस्थानमध्ये अतिभव्य मंदिरे आणि अतिभव्य कलाकुसरीचा उत्कृष्ट नमुना असलेल्या देवदेवतांच्या मूर्तींची मोठी परंपरा आहे. श्री क्षेत्र रामसगाव हे मोठे पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक आणि साहित्यिकदेखील वारसा असलेले महत्त्वाचे तीर्थक्षेत्र घनसावंगी तालुका, जिल्हा जालना इथे आहे. दक्षिणगंगा असलेली गोदावरी नदी गावाला वळसा घालून जाते. रामसगाव आद्यकवयित्री महदंबेचं गाव म्हणूनही प्रसिद्ध आहे. जाज्वल्य अशा भगवंत श्री नृसिंहाचे स्थळ अशी या गावाची कीर्ती आहे.
रामसगाव या ठिकाणी श्री आनंदी-लक्ष्मी नृसिंह संस्थान येथे श्री भगवान नृसिंहाचा जन्म महोत्सव यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानिमित्त श्री विष्णूच्या दशावतारापैकी चौथ्या अवताराची प्रतिष्ठापना गावात आहे. देशभरातील अनेक प्रसिद्ध नृसिंह मंदिरांपैकीच हेही अतिभव्य विशालकाय मूर्ती असलेले मंदिर आहे. मात्र फारच कमी जाणकार लोकांना भगवंताच्या भव्य मूर्तीची माहिती आहे.
रामसगाव येथे श्री नृसिंहाची काळ्या पाषाणाची सुबक मूर्ती प्रतिष्ठापित आहे. साधारण चारशे वर्षांचा इतिहास या मंदिराला आहे, आणि सेवेकऱयांची चौथी पिढी येथे सेवा देत आहे. श्री नृसिंह-भगवानाची मूर्ती भव्य अशी शालीन सुंदर असली तरी स्वभावतः उग्ररूप आहे, मूर्तीवर अप्रतिम कलाकुसर आहे. शंख, चक्र, गदा, नखीधारी योगमुद्रा आहे. मूर्तीवर मोडी लिपीत काही कोरीव काम आहे, जाणकार इतिहास तज्ञांनी त्याचा अर्थ लावण्याची प्रतीक्षा आहे. मूर्तीला दररोज पितांबर उपरणे नेसवून गंधलेपन, अलंकार चढवून सजवतात. ही कला येथील पुजारीवर्गाने शिकून घेतली, जपली आणि वृद्धिंगत केली. भव्य अशा उग्ररूप मूर्तीला बारा महिने आवडीने दररोज सजवून सेवा अर्पण केली जाते. पूजेच्या वेळी खडय़ा आवाजातील मंत्रोच्चार अवघ्या गावाला धार्मिक आध्यात्मिक संदेश देत असतात. गावकरी, भाविक, पंचक्रोशीतले श्रद्धाळू कोणत्याही शुभकार्यप्रसंगी ग्रामदेवतेचे दर्शन घेऊनच कार्याला सुरुवात करतात, अशी परंपरा आहे.
प्रतिवर्षी वैशाख महिन्याच्या शुद्ध षष्ठीपासून ते चतुर्दशी नवरात्र उत्सव असतो. उत्सवाला गावकरी आणि पंचक्रोशीतले लोक उत्साहाने श्री नृसिंह जन्म सोहळा करतात आणि गावावर श्रीहरीची कृपा कायम असावी, संकट विमोचन करावे, अशी प्रार्थना करतात. चतुर्दशीला श्री नृसिंह आख्यायिकेप्रमाणे सूर्य अर्धा वर अर्धा बुडालेला ही अवस्था मंदिराच्या पश्चिम दारातून सहज दिसते. या घटीकेला जन्म-उत्सव साजरा होतो. नवरात्रीचे नऊ दिवस भजन-कीर्तन आणि गायन सेवा श्री चरणी सादर केली जाते.
साडेतीनशे-चारशे वर्षांपूर्वी श्री नृसिंह मूर्ती गोदावरीच्या पात्रात सापडली. त्या विशाल पाषाणाच्या पाठीवर गावकरी महिला धुणे धूत असत. एका दृष्टान्तामध्ये मूर्तीने आपली प्रतिष्ठापना करण्याचा आदेश गावातील एका भाविकाच्या स्वप्नात येऊन दिला. त्याने गावकऱयांच्या मदतीने एका बैलगाडीतून ही महाकाय मूर्ती गावात आणली आणि जिथे गाडी अडली तिथेच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली, असे मानण्यात येते. उंच टेकडीवर मंदिर उभारले, मंदिराला दोन प्रदक्षिणा दरवाजे असून तिसरा दरवाजा पश्चिमेकडे आहे. याच दारातून जन्माच्या वेळी सूर्यास्ताचे कवडसे मूर्तीवर पडतात आणि जन्म मुहूर्त साजरा केला जातो, अशी प्रथा आहे. पश्चिम दारातून थेट नदीच्या पात्रात उतरणाऱया पायऱया आहेत. गेल्या अनेक वर्षांत गोदावरीचे पात्र अरुंद झाले, काही ठिकाणी पात्र बदलले. तरी पश्चिमेकडे असलेल्या दारातून गोदावरीच्या मनोहारी पात्राचे दर्शन होते. मूर्तीच्या त्यापूर्वीच्या इतिहासाबद्दल मात्र काही ठोस पुरावे नाहीत.
या गावाला मोठा पौराणिक संदर्भदेखील आहे. राजा दशरथाच्या मृत्यूसमयी श्रीराम वनवासात होते, तेव्हा आपल्या वडिलांचा म्हणजेच राजा दशरथाचा दशक्रिया विधी श्रीरामाने याच तीर्थक्षेत्री केल्याचा उल्लेख रामायणात आढळतो. तेव्हापासून याठिकाणी दशक्रियेला मोठे महत्त्व आहे. याचबरोबर सिंहस्थामध्ये कुंभमेळ्याचे जे अनेक गंगाकाठ आहेत त्यापैकी एक रामसगावदेखील आहे. सिंहस्थामध्ये येथे गंगास्नानासाठी भाविक येतात. या तीर्थ क्षेत्राचे महत्त्व ओळखून पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी विस्तीर्ण घाट बांधलेला आहे व दशक्रिया विधीची सोय करून दिली. तेरावा भोजन आणि विधीची व्यवस्थाही गोदावरीकाठीच करण्यात आली आहे. पालकमंत्री राजेश टोपे यांच्या पुढाकारानेही रस्ते, गंगाकाठचे धार्मिक विधी अशा विविध सुविधा मिळाल्या आहेत. श्री नृसिंह मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी शासनदरबारी रेटा लावलेला आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण स्थळ असलेल्या मंदिराचा लवकरात लवकर उद्धार होऊन गावाची कीर्ती सर्वदूर पोहोचावी अशी स्थानिक ग्रामस्थांची तळमळ आहे. अत्यंत जाज्वल्य, तेजस्वी, कल्याणकारी भगवंताच्या श्री नृसिंह अवताराच्या दर्शनासाठी आवर्जून जावे असे हे तीर्थक्षेत्र आहे.



























































