‘स्थान’ माहात्म्य – लेखमाला क्र. 17 – श्रीदेव लक्ष्मीनारायण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विवेक दिगंबर वैद्य

श्रीदेव लक्ष्मीनारायणाविषयीची अन्य एक दंतकथा मात्र बाळबोध, लोकसंस्कृतीतून आलेली असून सर्वसामान्य माणसाला आपलीशी वाटणारी आहे. श्रीनारोबा व श्रीमाऊली (महिषासुर मर्दिनी) ही भावा-बहिणींची जोडी देशांतरास निघाली. वाटेत, माऊली तहानेने व्याकूळ झाल्यामुळे भाऊ नारोबा पाण्याचा शोध घेत डोंगरपठारावरून खाली उतरला. (हा डोंगर पठार म्हणजे आत्ताच्या कुपी डोंगरातील ‘सपाट’ भाग.) खाली ब्राह्मणांच्या वस्तीत स्वयंपाकाची तयारी सुरू होती. त्यातच कुण्या एकाच्या घरातून खमंग वडे तळल्याचा गंध नारोबाची भूक खवळून टाकता झाला. त्या तळणीच्या घमघमाटाने नादावलेला नारोबा पाणी आणण्याचे विसरला आणि तिथेच रेंगाळत राहिला.

चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात माधव नावाच्या वीरपुरुषाने मोगलांची दांडगाई मोडून काढली. वालावलनजीकचे ‘कोचरे’ हे गाव पूर्वी ‘माधवपूर’ नावाने प्रसिद्ध होते व येथील परिसर ‘माधवाचा पट्टा’ म्हणून परिचित झाला. त्याचे कारण हाच माधव नावाचा वीरपुरुष होता. याच काळात श्रीदेव लक्ष्मीनारायणाचे मंदिर स्थापन झाले असे अनुमान सन 1391च्या एका ताम्रपटावरून काढण्यात आले आहे.

श्रीलक्ष्मीनारायण देवस्थान चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात बांधण्यात आले तरी श्रीदेव लक्ष्मीनारायणाची मूर्ती प्राचीन व पूर्वापार आहे. काहींच्या मते ही मूर्ती ‘कल्याण पुरुष’ याने स्थापन केली तर काहींच्या मते गौड ब्राह्मण सामंत कुळातील चंद्रभान व सूर्यभान या दोघा कर्तबगार बंधूंनी स्थापन केल्याचे सांगितले जाते. या मतमतांतराला पूरक ठरणाऱया काही दंतकथादेखील येथे प्रचलित आहेत.

कर्नाटकातील समुद्रकिनाऱयावर द्वारा येथे वसलेले हळळेबीड पूर्वी श्रीक्षेत्र द्वारावती नावाने प्रसिद्ध होते. येथे श्रीविष्णू भगवंताच्या 24 नावांशी साधर्म्य राखणाऱया प्रतिकात्मक मूर्ती प्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. काही काळानंतर त्यातील एक मूर्ती नाहीशी झाल्याने 23 मूर्तीच शिल्लक राहिल्या. या मूळ 24 मूर्तीपैकी नाहीशी झालेली अनिरुद्धाची मूर्ती हीच वालावल येथील श्रीदेव लक्ष्मीनारायणाची मूर्ती आहे. ‘कल्याण पुरुष’ नावाच्या व्यापाऱयाने ही मूर्ती आपल्या नौकेतून आणली. मात्र त्याच वेळी अचानक उसळलेल्या वादळामुळे नौका भरकटली आणि भलत्याच किनाऱयाला लागली. वादळ शमल्यावर कल्याण पुरुषाने पुन्हा नौका हाकारण्याचा प्रयत्न केला. मात्र ती जागची हलेना. हरेक प्रयत्न करून झाले तरी नौका सुरू होईना. तेव्हा आपल्यासोबत आणलेल्या मूर्तीमुळे तर हे घडले नसावे? अशी शंका कल्याण पुरुषाच्या मनात डोकावली. त्याने अनिरुद्धाची मूर्ती बाहेर काढून किनाऱयावर ठेवली आणि आश्चर्य म्हणजे लगेचच नौका जागची हलली आणि मार्गस्थ झाली. हा समुद्रकिनारा ‘हरमल’ गावचा होता. अशा रितीने, कर्नाटकच्या द्वारावती येथील अनिरुद्धाची मूर्ती ‘हरमल’ येथे पोहोचली खरी. मात्र काही काळानंतर, गोमांतकातील मोगलांच्या दंगलीपासून सुरक्षित ठेवण्याकरिता अनिरुद्धाची मूर्ती ’हरमल’ येथून थेट ‘वालावल’ येथील एका राईत (झाडा-झुडपांनी वेढलेल्या परिसरात) लपवण्यात आली. पुढे मोगलाईचा धुमाकूळ शमल्यावर ही मूर्ती ‘वालावल’ गावामध्येच ‘श्रीदेव लक्ष्मीनारायण’ या नावाने स्थापन करण्यात आली. या देवतेची संपूर्ण व्यवस्था ‘कल्याण पुरुष’ याने स्वतः केली आणि आयुष्याच्या अखेरीस श्रीदेव लक्ष्मीनारायणाच्या पादुका ‘माथ्यावर’ ठेवत त्याने देहत्याग केला. या कल्याण पुरुषाची समाधी श्रीदेव लक्ष्मीनारायण मंदिरासमोर घुमटीमध्ये बांधण्यात आली. आजही या घुमटीवर श्रीदेवांच्या पादुका पाहावयास मिळतात.

वरील दंतकथेला पुरावा म्हणून हरमलच्या समुद्रकिनारी वसलेले नारायणाचे मूर्तीविहीन मंदिर दाखवण्यात येते. येथील सध्याच्या मूर्ती मात्र दशकभरापूर्वीच्या आहेत. ‘मठ गावचा शिलालेख आणि कुडाळप्रांताचा प्राचीन इतिहास (अ. ब. वालावलकर), ‘मठ गावचा शिलालेख आणि ब्राह्मण सामंत राजवंश (रावबहादूर वा. अ. बांबर्डेकर) या ग्रंथापेक्षा वेगळे अनुमान मांडताना कै. गुं. फ. आजगांवकर यांनी ‘वालावल दर्शन’ या ग्रंथामध्ये ‘कल्याण पुरुष हा अन्य कोणी नसून ज्याने श्रीदेवनारायणाची मूर्ती आपल्या वृत्तीच्या मूळ गावात कुलदेवतेच्या रूपाने स्थापन केली, ज्याने या देवतेची पूजा-अर्चा करण्यासाठी अर्ध्या गावाचे उत्पन्न तोडून व्यवस्था राखली, ज्याची कीर्ती कुडाळ प्रांतामध्ये सर्वांमुखी कायम आहे, तो ‘कल्याणपुरुष’ प्रत्यक्ष नारायणभक्त राजे सूर्यभानप्रभू असून श्रीदेव लक्ष्मीनारायण मंदिराच्या समोर मूर्तीरूपाने घुमटीमध्ये स्थापन झालेला आहे. त्या शेजारी त्याचा बंधू चंद्रभानप्रभू याची मूर्ती आहे. मंदिर संस्थापकांची स्मृती प्रवेशद्वारापाशी दिसून येते. या घुमटीच्या माथ्यावर पादुका कोरलेल्या आहेत. ज्याप्रमाणे वैकुंठनिवासी श्रीनारायणभक्त गरुड आहे त्याचप्रमाणे श्रीदेव लक्ष्मीनारायणाचे भक्त सूर्यभानप्रभू आणि चंद्रभानप्रभू श्रीदेव लक्ष्मीनारायणाच्या पादुका विनम्रभावे आपल्या मस्तकी धारण करून आहेत.’

श्रीदेव लक्ष्मीनारायणाविषयीची अन्य एक दंतकथा मात्र बाळबोध, लोकसंस्कृतीतून आलेली असून सर्वसामान्य माणसाला आपलीशी वाटणारी आहे. श्रीनारोबा व श्रीमाऊली (महिषासुर मर्दिनी) ही भावा-बहिणींची जोडी देशांतरास निघाली. वाटेत, माऊली तहानेने व्याकूळ झाल्यामुळे भाऊ नारोबा पाण्याचा शोध घेत डोंगरपठारावरून खाली उतरला. (हा डोंगर पठार म्हणजे आत्ताच्या कुपी डोंगरातील ‘सपाट’ भाग.) खाली ब्राह्मणांच्या वस्तीत स्वयंपाकाची तयारी सुरू होती. त्यातच कुण्या एकाच्या घरातून खमंग वडे तळल्याचा गंध नारोबाची भूक खवळून टाकता झाला. त्या तळणीच्या घमघमाटाने नादावलेला नारोबा पाणी आणण्याचे विसरला आणि तिथेच रेंगाळत राहिला. वस्तीतील ब्राह्मणांनी हे पाहिले. त्यांनी नारोबाची विचारपूस केली व त्यास जेवू घातले. क्षुधाशांती झाल्याने तृप्त झालेल्या नारोबासमोर पाण्याचे भांडे येताच, त्याच्या डोळ्यासमोर पाण्याने व्याकूळ झालेल्या बहिणीचा, माऊलीचा चेहरा आला. तो घाईघाईत तिथून पाणी घेऊन डोंगरपठारावर गेला. मात्र, नारोबाचे हे कृत्य अंतर्ज्ञानाने जाणलेल्या व संतापलेल्या माऊलीने नारोबाच्या ‘श्रीमुखात’ लगावली. पुढे, देशांतराचा बेतही रद्द झाला आणि वादामुळे फारकत घेतलेल्या माऊलीचे वास्तव्य गावाच्या सडय़ावर तर नारोबाचे वास्तव्य ब्राह्मणवस्तीजवळ झाले.

याच कारणाने, नारोबा अर्थात श्रीनारायण दरवर्षी चातुर्मासात ब्राह्मणांच्या घरी राहतो व दसऱयाच्या दिवशी चातुर्मासातील ब्राह्मणांच्या घरातील वास्तव्य संपवून पालखीतून माघारी परत येतो. कार्तिक शु. द्वादशीस मात्र हा भाऊराया, बहिणीच्या अर्थात माऊलीच्या भेटीसाठी डोंगरावर पालखीतून जातो. या अनुषंगाने, नारोबा अर्थात श्रीनारायण, वडे दाखविण्याचा नवस केल्याने पावतो असा पूर्वापार समज आहे आणि, श्रीदेव नारायणाच्या डाव्या गालावरील खड्डासदृश भाग हा माऊलीच्या हातून मिळालेल्या माराची ‘खूण’ आहे असेही मानले जाते.

– [email protected]