
अभिनेता सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणी त्याचा मित्र सिद्धार्थ पिठाणीला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो(एनसीबी) मुंबई युनिटने अटक केली. सिद्धार्थला हैदराबाद येथून अटक करून आज मुंबईत आणले. सुशांतला ड्रग्ज पुरवल्याचा सिद्धार्थवर आरोप आहे.
सिद्धार्थ हा सुशांतचा रूम मेट असून तो त्याच्यासोबत राहत होता. गेल्या वर्षी 14 जूनला सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरी जेव्हा आत्महत्या केली होती तेव्हा सर्वात पहिल्यांदा सिद्धार्थने सुशांतला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पाहिले होते. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबीयांनी सुशांतची पेयसी रिया चक्रवर्तीसह अन्य जणांवर गंभीर आरोप केले होते. त्याचदरम्यान ड्रग्ज लिंक समोर आल्यावर एनसीबीने तपास सुरू केला. तपासादरम्यान रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शौविकचेदेखील नाव समोर आले होते. त्या दोघांनादेखील एनसीबीने अटक केली होती.
नुकतीच एनसीबीने गोव्यात कारवाई करून हेमंत शहा ऊर्फ महाराजला अटक केली होती. महाराज हा एनसीबीने यापूर्वी अटक केलेल्या अनुज केसवानी आणि रिगल महाकालला ड्रग्ज पुरवत होता. त्या पेडलरकडून ड्रग्ज घेऊन ते सुशांतला दिले जात असायचे. त्यानंतर एनसीबीने तपास करून सिद्धार्थची माहिती काढली. एनसीबीला काही व्हॉट्सअॅप चॅट्स आणि ई-मेल मिळाले. सिद्धार्थ हा हैदराबादला असल्याची माहिती मिळताच झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे पथक हैदराबादला गेले. तेथून सिद्धार्थला अटक करून मुंबईत आणले. सिद्धार्थविरोधात एनडीपीएस कलम 20 (बी) मोठय़ा प्रमाणात अमली पदार्थ खरेदी, 27 (अमली पदार्थांचे सेवन करणे), 27 (ए) ड्रग्ज तस्करीत पैसे कमवणे अशा कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. कलम 27 (ए) मध्ये सिद्धार्थला कमीत कमी 10 वर्षे आणि 1 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. सिद्धार्थला आज न्यायालयात हजर केले असता त्याला एनसीबी कोठडी सुनावली आहे.





























































