वैद्यकीयदृष्ट्या आत्मनिर्भर होण्यासाठी आयुर्वेदाला पर्याय नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य सेवांना अभूतपूर्व उपाययोजना करायला भाग पाडले आहे. जगातील अनेक देशांनी सामाजिक (शारीरिक) अंतर ठेवणे, तोंडावर मास्क लावणे, टाळेबंदी यांसारखे कडक निर्बंध लागू केले होते.

सुरळीत चाललेले जागतिक जनजीवन जेव्हा एखाद्या साथीच्या आजाराने धोक्यात येते, तेव्हा जीवनदान हे एकमेव उदात्त ध्येय असलेले वैद्यकीय विश्व आपल्या शास्त्राचे ज्ञान, अनुभव, संशोधन पणास लावते. मग, आयुष्याचा वेद असलेले आयुर्वेद हे जगातील सर्वांत पुरातन असे हिंदुस्थानी वैद्यकशास्त्र यास अपवाद कसे असेल? कोरोना हा वैद्यक विश्वापुढील आव्हान आहे. आयुर्वेदाच्या आधारे या आजाराशी कसा सामना करता येईल, याचा विचार करणे आवश्यक आहे. आयुर्वेदाचा भर मुख्यतः आजार होऊच नये, यासाठी आचरण करण्याचा आहार-विहार औषधयोजना आणि आजार झालाच तर शरीरधातू सक्षम करून आजाराविरुद्ध लढण्यास शरीराची प्रतिकारशक्ती सक्षम करणे यावर आहे.

गेल्या वर्षी फेब्रुवारी 2020 पासून कोरोनाचे रुग्ण आपल्या देशात सापडायला लागले. सुरुवातीला त्याची तीक्रता लक्षात आली नाही; परंतु एप्रिल, मेच्या सुमारास त्याची तीव्रता लक्षात आली. केंद्र सरकारने त्वरित काही उपाययोजना आणि संचारबंदी घोषित केली. त्याचे समाजाने सकारात्मक स्वागत केले, त्याला पाठिंबा दिला व त्याचे चांगले परिणामसुद्धा आपल्या देशात पाहायला मिळाले. जगात अधिक लोकसंख्या असलेल्या आपला देश असूनही ह्या काळात कमी मृत्यूदर आपल्याकडे आढळला.

आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून सर्व नागरिकांसाठी प्रतिबंधात्मक उपायांची नियमावली जाहीर केली गेली. त्यामध्ये वातावरण शुद्धी पासून आहार-विहार, काही घरगुती उपाय, आयुष काढय़ासारखे काही उपाय जाहीर केले गेले. सर्व समाजाने याचेसुद्धा मनापासून स्वागत केले. आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच आयुर्वेदिय उपचारांना देशभर चांगला प्रतिसाद आणि प्रसिद्धी मिळाली.

सामाजिक संस्था, संघटनांनी प्रचार व प्रसार केला. काढय़ाचे वाटप केले गेले. काढय़ाचे नीट सेवन केलेल्यांमध्ये कोरोना झाल्याचे प्रमाण अत्यल्प मिळाले. या विकाराची लक्षणे, त्याची तीक्रता, त्याच्या अवस्था व त्याप्रमाणे त्याची सविस्तर चिकित्सा याची मार्गदर्शक तत्त्वेदेखील वैद्यांपर्यंत पोहोचवण्यात आली तसेच आयुष मंत्रालयापर्यंतसुद्धा ही चिकित्सा पोहोचवून केंद्र सरकारची मान्यता मिळावी, यासाठी प्रयत्न केले गेले. अनेक वैद्यांनी कमी लक्षणे असलेले, मध्यम लक्षणे असलेले आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या गंभीर अवस्थेत असलेले रुग्ण ठीक केले आहेत.

परंतु, ऍलोपॅथीच्या डॉक्टरांकडून याचा प्रखर विरोध झाला आहे. केंद्र सरकारने यामध्ये आडमुठेपणाचे धोरण स्वीकारले. विविध स्तरांवर टॉस्क फोर्सची निर्मिती झाली. त्यामध्ये आमचे वैद्यसुद्धा सहभागी होते. परंतु, प्रत्येक ठिकाणी तुमची औषधे टाइम टेस्टेड आहेत का? त्यांच्या चाचण्या केल्या आहेत का? यांसारखे प्रश्न उपस्थित करून आयुर्वेदीय औषधांना मान्यता देण्यापासून रोखण्यात आले.

वस्तुतः कोरोना हा नवीन विकार असून, त्यासाठी आयुर्वेदावर विशिष्ट औषध सांगितले असेल याची शक्यता नाही. आता आम्ही जी चिकित्सा करतो ती कोरोनासदृश लक्षणे आयुर्वेदात कोणत्या व्याधीत सांगितली आहेत, त्यावर काय चिकित्सा सांगितली आहे, त्यानुसार चिकित्सा करतो. त्याचे निदान आयुर्वेदीय पद्धतीने केलेले असते. तरीसुद्धा त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतात. अमुक एका विकारावर आयुर्वेदात काही उपाय आहेत ते सिद्ध झाले आहे का? असे प्रश्न गेले कित्येक वर्षे आम्ही ऐकत आलो आहोत. मुळात वर उल्लेख केल्याप्रमाणे नवीन निदान अपेक्षित असल्याप्रमाणे जे असेल तेच निदान आम्ही आयुर्वेदीय चिकित्सा करताना करत नाही. त्यामुळे तपासणीसाठी त्याच मोजपट्टय़ा आम्ही वापरत नाही. आता आयुर्वेदात संशोधन झाले पाहिजे, अशी ओरड गेली अनेक वर्षे चालू आहे. परंतु, अशाप्रसंगी आयुर्वेदीय औषधे देण्यास परवानगी मात्र दिली जात नाही. अशाने संशोधन कसे होणार? आता जगात चिनी वैद्यक शास्त्रचा दबदबा आहे. आपल्याकडे अगदी विरुद्ध परिस्थिती आहे. एका प्रोजेक्टच्या माध्यमातून हळदीच्या पेटंटची लढाई ज्येष्ठ शास्त्र्ाज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी जिंकली. त्या हळदीचा कॅन्सरवर चांगला उपयोग होतो, हे सिद्ध झाले आहे. आता युरोप, अमेरिका या देशांमध्ये हळदीची लाट आली आहे. अनेक गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांना अन्य चिकित्सेबरोबर आयुर्वेदीय औषधांचा चांगला उपयोग होतो, असा अनुभव आहे. संयुक्त उपचार घेणाऱयांची संख्या खूप आहे.

एकीकडे प्रतिकार क्षमता वाढवली पाहिजे असे सांगितले जाते व त्याच्या विपरित कृती चालू असते. सध्या लॉकडाऊन सुरू आहे. तर सकाळी लवकर उठून व्यायाम करण्याऐवजी लोक उशिरा उठत आहेत. गेल्या काही वर्षांत आलेल्या सर्व रोगांच्या साथीत प्रतिकार क्षमता सक्षम केली पाहिजे असे सांगितले जाते. ते साध्य करायचे असल्यास आयुर्वेदाने सांगितलेली दिनचर्या, ऋतुचर्या, आहार-विहार यांचे पालन केले पाहिजे. जोडीला योगाचासुद्धा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात सत्तर एक आयुर्वेदीय रुग्णालये असूनही तेथील अनुभवी वैद्य, अध्यापक, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग व आयुर्वेदाचे विद्यार्थी यांना कोविडच्या रुग्णांना आयुर्वेदीक उपचार करण्याची संधी देऊन, त्यांना या लढय़ात सहभागी करून घेण्यात आले नाही. या सर्व रुग्णालयांत आयुर्वेदीय उपचार करण्याची परवानगी दिल्यास आयुर्वेदाचे संशोधनकार्यही करता येईल व रुग्णांनाही प्रमाणात फायदा
होऊ शकेल.

आयुर्वेद ही एक प्राचीन चिकित्सा पद्धती आहे. तिचे स्वतःचे सिद्धांत आहेत आणि स्वतःची भाषा आहे. अन्य शास्त्र्ाांचे निकष लावून हे शास्त्र सिद्ध करायला लावणे हा अशास्त्रीय मार्ग आहे. आयुर्वेद हा केवळ स्वास्थरक्षण आणि प्रतिकारशक्ती वर्धन या पुरताच सिमित नाही. अनेक आजारांची यशस्वी चिकित्सा आयुर्वेदाच्या साहाय्याने करता येते. आजार साध्य आहे की असाध्य हे ठरवण्याचे आयुर्वेदाचे स्वतःचे निकष आहेत. आयुर्वेद आयुर्वेदाच्या भाषेत समजून घ्यायला हवा आणि वैद्यांना तसेच काम करण्याचे स्वातंत्र्य मिळावे. हिंदुस्थान वैद्यकीयदृष्टय़ा आत्मनिर्भर व्हायचा असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही.