
जगातील धनाढय़ बोर्ड म्हणून बीसीसीआयकडे बघितले जाते. हिंदुस्थानमुळेच आयसीसीलाही मोठय़ा प्रमाणात महसूल प्राप्त होतो. हिंदुस्थानसोबतच्या दौऱयांमुळे इतर देशांतील क्रिकेट बोर्ड मालामाल होतात. याच कारणामुळे बीसीसीआयचे राज्य आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर प्रकर्षाने दिसून येते. आता हीच बीसीसीआय आयपीएलचा उर्वरीत मोसम व टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनासाठी खटाटोप करताना दिसत आहे. आयपीएलचा उर्वरीत मोसम यूएईकडे वळवण्यात बीसीसीआयला यश लाभले असून टी-20 वर्ल्ड कपसाठीही मोर्चेबांधणी करायला त्यांनी सुरुवात केली आहे. या दोन स्पर्धांच्या आयोजनामधून बीसीसीआयला कोरोनाच्या काळातही बक्कळ पैसा कमवता येणार आहे. याच पार्श्वभूमीवर दैनिक ‘सामना’ने टाकलेला प्रकाशझोत…
स्पर्धेचे स्थळ बदलले, आता बोर्डांची मनधरणी करणार
बीसीसीआयने आयपीएलचा उर्वरीत मोसम यूएईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला. 2500 कोटी वाचवण्यासाठी आता ही स्पर्धा सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांमध्ये खेळवण्यात येणार आहे. याच कालावधीत इतर देशांचे आंतरराष्ट्रीय दौरेही आहेत. तसेच इंग्लंड अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास परवानगी दिलेली नाही. बीसीसीआय मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहे. आयसीसीसह इतर क्रिकेट बोर्ड आपले म्हणणे ऐकणार याची शाश्वतीही बीसीसीआयला आहे. क@रेबियन प्रीमियर लीगचे आयोजन दहा दिवस आधी करावे, अशी मागणी बीसीसीआयकडून या वेळी करण्यात आली आहे. इंग्लंड अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डालाही मनवण्यात बीसीसीआय यशस्वी होईल यात शंका नाही.
900 कोटी वाचवण्यासाठी प्रयत्न
बीसीसीआयला आयपीएलसह टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन कोणत्याही परिस्थितीत करावयाचे आहे. यासाठीच त्यांनी आयसीसीकडे एक महिन्याचा अवधी मागितला आहे. हिंदुस्थानातील कोरोनाच्या परिस्थितीवर टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन अवलंबून असणार आहे. पण त्याआधी बीसीसीआयला केंद्र सरकारसोबत बोलणी करून ‘कर’ या विषयाचे प्रकरण निकालात काढावे लागणार आहे. कारण केंद्र सरकारकडून स्पर्धेच्या आयोजनासाठीच्या करात सूट देण्यात आली नाही तर बीसीसीआयसह आयसीसीलाही मोठय़ा रकमेवर पाणी सोडावे लागणार आहे. बीसीसीआयला स्पर्धा आयोजनासाठी लागणाऱया रकमेच्या 46 टक्के अर्थातच 900 कोटी रुपये कराच्या रूपात द्यावे लागणार आहेत. हे बीसीसीआयला परवडणारे नाही. त्यामुळे बीसीसीआय ही कराची रक्कम वाचवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करीत आहे.
यूएईमध्ये स्पर्धा पण…
हिंदुस्थानात सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत कोरोनाची तिसरी लाट येणार आहे, असे तज्ञांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे बीसीसीआयला आयपीएलप्रमाणे टी-20 वर्ल्ड कपही हलवावा लागल्यास या वेळीही यूएईलाच प्राधान्य देण्यात येणार आहे. पण टी-20 वर्ल्ड कप यूएईकडे हलवल्यानंतरही या स्पर्धेवर बीसीसीआयचाच हक्क असणार आहे. यूएईतील क्रिकेट बोर्डाला करारानुसार रक्कम दिली जाईल. पण मोठय़ा प्रमाणातील महसूल बीसीसीआयलाच मिळेल. त्यामुळे या वेळी आयपीएल व टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनामधून बीसीसीआयची तिजोरी पुन्हा एकदा भरेल असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.


























































