मोदींनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा! काँग्रेसची राज्यभर निदर्शने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नरेंद्र मोदींनी 2014 च्या निवडणुकीत जनतेला खोटी स्वप्ने दाखवून सत्ता मिळवली, पण सात वर्षांत मोदी सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यातही मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. पहिल्या लाटेत ‘नमस्ते ट्रम्प’च्या आयोजनात व्यस्त राहिले आणि परिस्थिती अंगलट येताच तबलिगींच्या नावावर कोरोनाचे खापर फोडले. मोदींनी आपल्या मनमानी कारभाराने 130 कोटी जनतेला कोरोनाच्या दरीत लोटले आहे. तेव्हा त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केली.

मोदी सरकारच्या सात वर्षांच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने आज जिल्हा-तालुका स्तरावर काळ्या फिती लावून निदर्शने केली तसेच मोदी सरकारचा निषेध केला. याविषयी पत्रकार परिषद घेऊन नाना पटोले यांनी माहिती दिली. ते म्हणाले, महागाई प्रचंड वाढल्याने लोकांना जगणे कठीण झाले आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेल सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे, अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे.

पाकिस्तानसारख्या देशाला मोफत लस वाटली आणि देशातील जनतेला वाऱयावर सोडले. खासदार राहुलजी गांधी म्हणाले होते की, मोदी सरकार हे सूटबूटवाल्यांचे सरकार आहे. आता तर हे फक्त पैसेवाल्यांचे पंचतारांकित सरकार आहे हे सिद्ध झाले आहे. कोरोना लसीसाठी श्रीमंतांना पंचतारांकित ट्रीटमेंट दिली जात आहे आणि दुसरीकडे गरीबांना मात्र लसीसाठी रांगेत ताटकळत उभे रहावे लागत आहे. सामान्य जनतेला रांगेत उभे करणे हेच मोदींचे धोरण आहे. यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, चरणसिंग सप्रा, प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील, सरचिटणीस संदेश कोंडविलकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.