
देशभरात कोरोनाच्या दुसऱया लाटेने अनेक ठिकाणी हाहाकार उडाला होता. रुग्णसंख्येनेदेखील रेकॉर्ड ब्रेक केला. मात्र आता कोरोनाची ही दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र देशात दिसून येत आहेत. गेल्या तीन आठवडय़ांतील देशातील कोरोनाची रुग्णसंख्या तब्बल 50 टक्क्यांनी कमी नोंदविण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. देशात 8 मेच्या आसपास तब्बल तीन लाखांच्या घरांत पोहचलेली रुग्णसंख्या आता थेट 1 लाख 95 हजारांपर्यंत पोहचली आहे.
देशात कोरोनाच्या दुसऱया लाटेत अनेक ठिकाणी परिस्थिती गंभीर झाली होती. या लाटेत वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रश्नही सतावू लागल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले होते. देशातील सर्वांना धडकी भरविणारी ही दुसरी लाट आता मात्र ओसरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
अनेक ठिकाणी रुग्णसंख्या घटली असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. कोरोनाची पहिली लाट गेल्या वर्षी 17 सप्टेंबरच्या दरम्यान आली. त्यावेळी जवळपास दिवसभरात 93 हजार 735 रुग्णसंख्येची नोंद झाली होती. ही रुग्णसंख्या कमी होण्यास तब्बल सात आठवडय़ांचा अवधी लागला होता. गेल्या वर्षी 30 ऑक्टोबरच्या दरम्यान कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा हा 46,380 वर पोहचला होता. आता दुसऱया लाटेत रुग्णसंख्या कमी होण्यासाठी तीन आठवडय़ांचा अवधी लागल्याचे दिसून आले आहे.
आकडेवारी
15 मे – 3.10 लाख
16 मे – 2.81 लाख
17 मे – 2.63 लाख
18 मे – 2.67 लाख
19 मे – 2.76 लाख
20 मे – 2.59 लाख
21 मे – 2.57 लाख
22 मे – 2.40 लाख
23 मे – 2.22 लाख
24 मे – 1.95 लाख
25 मे – 2.08 लाख
26 मे – 2.11 लाख
27 मे – 1.86 लाख
28 मे – 1.74 लाख
29 मे – 1.65 लाख
गेल्या 47 दिवसांतील नीचांक
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या वाढलेल्या रुग्णसंख्येचा आलेख अखेर घसरत असल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी देशात केवळ 1 लाख 65 हजार 144 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. ही आकडेवारी गेल्या 47 दिवसांतील सर्वात कमी आकडेवारी असल्याचे बोलले जात आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात 9 मेपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाल्याचे दिसून आले आहे. तत्पूर्वी, 31 मार्चला देशात 72 हजार तर 15 एप्रिलला कोरोनाची रुग्णसंख्या तब्बल दोन लाखांच्या आसपास नोंदविण्यात आली होती.
गेल्या 23 दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या घटली आहे. मात्र कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण मात्र तेवढेच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.





























































