
वेस्टर्न एक्प्रेस हायवेवरील वाहतूककोंडीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होणार आहे. एकदा का मेट्रो-2 अ आणि मेट्रो – 7 सुरू झाली की वेस्टर्न एक्प्रेस हायवेवरील 25 टक्के खासगी वाहने कमी होतील असे म्हटले जात आहे. मेट्रोचा चारकोप डेपो-डहाणूकरवाडी ते आरे हा 20 किलोमीटरचा पहिला टप्पा सप्टेंबर 2021 पर्यंत सुरू होणार आहे. याकरिता मेट्रो डब्यांचा वेग आणि कंपन चाचण्या घेतल्या जातील. आधीचे दोन महिने मेट्रोचे अधिकारी तर नंतर रेल्वेच्या ‘आरडीएसओ’ अधिकाऱयांच्या उपस्थितीत दोन महिने चाचण्या चालतील. अशा चार महिन्यांनंतर ऑक्टोबरमध्ये मेट्रोचा प्रवास सर्वसामान्यांकरिता खुला होईल असे एमएमआरडीएने म्हटले आहे.
मेट्रो मार्ग-2 अ (दहिसर ते डी. एन. नगर 18.6 कि.मी. व 17 स्थानके) आणि मेट्रो मार्ग-7 (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व 16.5 कि.मी. व 13 स्थानके) या मार्गावरील एकूण 20 कि.मी.च्या पहिल्या टप्प्यात चारकोप डेपो-डहाणूकरवाडी ते आरे असा सप्टेंबरपर्यंत प्रवास सुरू होईल आणि दुसरा टप्पा पुढील वर्षी जानेवारी 2022 च्या प्रारंभी सुरू होईल असा अंदाज आहे. आणि संपूर्ण 35 कि.मी.चे हे दोन्ही मेट्रो मार्ग पुढील वर्षी जानेवारी महिन्यात सुरू होणार आहेत. ऑक्टोबरनंतर दर महिन्याला दोन ट्रेन अशा प्रत्येकी सहा डब्यांच्या 10 ट्रेन बंगळुरू येथील बीईएमएल कंपनीच्या कारखान्यातून मिळणार आहेत. मेट्रो मार्ग-2 अ साठी रुपये 3525 कोटी तर मेट्रो मार्ग-7 करिता 2410 कोटी इतका खर्च मंजूर झाला असून कोरोना काळ असूनही खर्चात वाढ झालेली नाही.
प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअरची पहिली मेट्रो
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्लॅटफॉर्मला स्क्रीन डोअरची सुविधा असलेली ही मुंबईतील पहीली मेट्रो ठरली आहे. मुंबईत घाटकोपर ते वर्सेवा पहिल्या मेट्रो सेवेतदेखील ही सुविधा उपलब्ध नाही. प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअरचे तंत्रज्ञान नवीन असून ‘मेट्रो-2अ’वर ते बसविण्यात आले आहे. याच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. प्लॅटफॉर्मवर ट्रेन आल्यावर काही सेकदांनंतर हे स्क्रीन डोअर उघडले जातात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता कमी होते.
- मेट्रो 2 अ आणि मेट्रो – 7 सुरू झाली की वेस्टर्न एक्प्रेस हायवेवरील 25 टक्के खासगी वाहने कमी होतील. या खासगी वाहनांमुळेच पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतुकीची काsंडी निर्माण होते. खासगी वाहने कमी झाल्यास इतर वाहनांना महामार्गावरून वेगाने प्रवास करता येणार आहे.
मेट्रो सेवेचे भाडे खालीलप्रमाणे
कि.मी. रुपये
0-3 10
3-12 20
12-18 30
18-24 40
24-30 50
30-36 60
36-42 70
42 आणि वर ८०
337 किलोमीटरचे 14 मेट्रो मार्ग!
मुंबईत उपनगरीय रेल्वेमार्गावर दररोज 75 ते 80 लाख प्रवासी प्रवास करतात. लोकल ट्रेनमधील गर्दीमुळे लोकलमधून पडून दिवसाला सरासरी 8 ते 10 जणांचा हकनाक बळी जात असतो. मुंबईतील रस्ते उभारण्याची क्षमता संपली असून उपनगरीय रेल्वेसारखी ‘मास ट्रान्झिट सिस्टीम’ उभारणे परवडणारे नसल्याने मुंबईत जवळपास 337 किलोमीटरचे एलिव्हेटेड मेट्रो मार्गाचे जाळे निर्माण केले जात आहे. मुंबई आणि महानगर प्रदेशात भुयारी मेट्रोसह एकूण 14 मेट्रो मार्ग बांधले जात आहेत.






























































