परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोन डोसमधील कालावधी कमी करा, पालिकेचे केंद्राला पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱया विद्यार्थ्यांसाठी पालिकेने आठवडय़ाचे तीन दिवस सोमवार, मंगळवार आणि बुधवारी तीन लसीकरण केंद्रावर थेट लस देण्याचा निर्णय घेतला असून आजपासून याची अंमलबजावणी सुरू झाली. पालिकेच्या कस्तुरबा, राजावाडी आणि कूपर रुग्णालयात या लसीकरणासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. लसीकरणात दुसरा डोस देण्याची 84 दिवसांची मुदत विद्यार्थ्यांसाठी कमी करून सहा आठवडे करावी, अशा मागणीचे पत्र पालिकेने केंद्र सरकारला पाठवले आहे.

मुंबईत 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी लसींच्या अपुऱया पुरवठय़ामुळे वारंवार लसीकरणाला बेक लागत आहे. त्यामुळे 18 ते 44 वर्षे वयोगटाचे लसीकरणही तूर्तास स्थगित आहे. त्यामुळे परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱया विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱया विद्यार्थांना कस्तुरबा, राजावाडी आणि कूपर रुग्णालयात थेट लस घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही लस घेताना विद्यार्थ्यांनी परदेशी विद्यापीठ प्रवेशनिश्चिती पत्र, परदेशी व्हिसा, व्हिसा मिळवण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले आय-20 किंवा डीएस-160 फॉर्म ही कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे.

…म्हणूनच घेतला निर्णय

  • परदेशातील बहुतांशी विद्यापीठांचा अभ्यासक्रम ऑगस्टदरम्यान सुरू होतो. मात्र दुसऱया डोसमधील अंतर केंद्र शासनाच्या निर्देशानुसार 84 दिवस करण्यात आल्यामुळे या विद्यार्थ्यांना दुसरा डोस घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे दुसऱया डोसबाबत पालिकेने निर्णय घ्यावा अशी मागणी विद्यार्थी-पालकांकडून करण्यात येत होती.
  • त्यामुळे केंद्राला पत्र पाठवून दोन डोसमधील 84 दिवसांचे अंतर विशेष बाब म्हणून सहा आठवडय़ांपर्यंत कमी करावे अशी मागणी करण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. प्रत्येक केंद्रावर दिवसाला 100 विद्यार्थ्यांना डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने सर्व विद्यार्थ्यांना डोस मिळेपर्यंत मोहीम सुरूच राहणार असल्याचेही काकाणी यांनी स्पष्ट केले.