अपुऱया डोसमुळेच पालिका एक लाख लसीकरण उद्दिष्टापासून दूर, व्यवस्था असूनही पालिकेची कोंडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत पालिकेच्या माध्यमातून 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर पालिकेने काही दिवसांतच दररोज एक लाख डोस देण्यासाठी नियोजन-व्यवस्था केली. मात्र केंद्राकडून पुरेसे डोस मिळत नसल्याने पालिकेच्या लसीकरण मोहिमेला वारंवार ब्रेक लागत असून दररोज एक लाख लसीकरणाच्या उद्दिष्टापासून पालिका दूर राहत आहे. दरम्यान, पालिकेचे लसीकरण शुक्रवारपासून सुरू होणार आहे.

मुंबईत 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला ‘कोविन अॅप’मधील त्रुटींमुळे लाभार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत होता. यानंतर वेगाने लसीकरण केंद्रे वाढवून पालिकेने दररोज एक लाख डोस देण्यासाठी व्यवस्था उभी केली. अलीकडेच एकाच दिवशी 70 हजार डोस देण्याची कामगिरीही केली. मात्र अपुऱया डोसमुळे पुन्हा लसीकरणाला बेक लागला. लस उपलब्ध नसल्याने 3 जून रोजी लसीकरण बंद ठेवावे लागले. पालिकेने उपलब्ध होणाऱया कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन डोसचा वापर करून आतापर्यंत 31 लाख 17 हजार 890 डोस दिले आहेत. दरम्यान, अपुऱया डोसमुळे पालिकेने वेगाने लसीकरण करण्यासाठी उभी केलेली यंत्रणा आणि मनुष्यबळ अपुऱया डोसमुळे निरुपयोगी ठरते. त्यामुळे राज्याने पालिकेची लसीकरण मोहीम दररोज सुरू ठेवण्यासाठी जास्तीत जास्त डोस द्यावेत यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

असे झाले लसीकरण

जानेवारी 2 लाख 65 हजार
फेब्रुवारी 5 लाख 71 हजार
मार्च 8 लाख 10 हजार 950
एप्रिल 9 लाख 47 हजार 500
मे 5 लाख 23 हजार 440

केंद्राकडून खासगी क्षेत्राला डोस देण्याला प्राधान्य दिले जात आहे. पालिकाही पैसे द्यायला तयार आहे. शिवाय पालिकेच्या माध्यमातून नागरिकांना मोफत लस दिली जात आहे. पालिकेने लसीकरण वेगाने करण्यासाठी यंत्रणा उभी केली आहे. त्यामुळे केंद्राने मुंबईला पुरेसे डोस दिले पाहिजेत.
 किशोरी पेडणेकर, महापौर