
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी नार्कोटिक्स पंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने सुशांतचा बॉडीगार्ड साहिल सागरची 14 तास चौकशी केली. साहिलच्या चौकशीनंतर ‘एनसीबी’ येत्या काही दिवसांत आणखी काही जणांना चौकशीसाठी समन्स बजावणार आहेत.
अभिनेता सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणी ‘एनसीबी’ तपास करत आहे. नुकतीच ‘एनसीबी’ने सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठाणीला हैदराबाद येथून अटक केली होती. सुशांतच्या आत्महत्येनंतर ‘एनसीबी’ने तपास सुरू केल्यानंतर सिद्धार्थ हा मुंबई सोडून निघून गेला होता. अखेर ‘एनसीबी’ने त्याची माहिती काढून सिद्धार्थला हैदराबाद येथून अटक केली. सिद्धार्थच्या चौकशीनंतर ‘एनसीबी’ने सुशांतचे नोकर नीरज आणि केशवचीदेखील 18 तास चौकशी केली होती. त्या दोघांच्या चौकशीनंतर ‘एनसीबी’ने सुशांतचा बॉडीगार्ड साहिल सागरला चौकशीसाठी बोलवले होते.
बुधवारी सकाळी साहिल हा चौकशीसाठी आला होता. चौकशी अपूर्ण राहिल्यानंतर आज सकाळी साहिल पुन्हा चौकशीसाठी ‘एनसीबी’च्या कार्यालयात आला होता. गेल्या दोन दिवसांत ‘एनसीबी’ने साहिलची 14 तास चौकशी केली. सुशांत हा कोणाला भेटत असायचा, त्याने पार्टीमध्ये ड्रग्ज कधी घेतले होते का, त्याला ड्रग्ज कोण आणून द्यायचा याबाबत ‘एनसीबी’ने साहिलची चौकशी केली. चौकशी केल्यानंतर सायंकाळी पाच वाजता साहिल हा ‘एनसीबी’च्या कार्यालयातून बाहेर पडला. साहिलच्या चौकशीत ‘एनसीबी’ला काही माहिती मिळाली असून त्यावरून ‘एनसीबी’ पुढील तपास करणार आहे.























































