
कोरोनाच्या दुसऱया लाटेत लहान बालकांना असलेला कोरोनाचा धोका लक्षात घेता राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा होणे शक्य नाही. त्यामुळे दहावीप्रमाणेच राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षाही रद्द केल्याचा घोषणा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी केली.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकारी, टास्क फोर्सआणि शिक्षण विभागातील अधिकाऱयांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा रद्द करण्याविषयी चर्चा झाली होती. त्यानंतर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीच्या परीक्षा रद्द करण्यापूर्वी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवत असून त्यानंतर निर्णय घेतला जाईल असे जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर आज बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याचे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले.
राज्यात बारावीचे 13 लाख 70 हजार विद्यार्थी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर, अमरावती, लातूर, कोकण, नागपूर, कोल्हापूर या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत यंदा बारावीच्या परीक्षेला 13 लाख 70 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली. सरकारने आजच निर्णय घेतला असल्याने त्यावरील पुढील धोरण ठरविण्यात आल्यानंतर मंडळाची पुढील कार्यवाही सुरू केली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
येणारे नवीन शैक्षणिक वर्षही ऑनलाइन
राज्यातील काही शहरांत तसेच ग्रामीण भागात अद्याप कोरोनाची दुसरी लाट कमी झालेली नाही. तर काही शहरे आणि जिह्यांमध्ये प्रादुर्भाव कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र तरीही 15 जूनपासून सुरू होणाऱया नवीन शैक्षणिक वर्षात राज्यात शाळा सुरू होणार नाहीत, अशी माहितीही विजय वडेट्टीवार यांनी दिली. त्यामुळे येणारे नवीन शैक्षणिक वर्षही विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइनच असणार आहे.
- भविष्यात होणाऱया बोर्डाच्या परीक्षा संबंधित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पात्र विद्यार्थी यांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा द्यावा व त्यांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्राकडे केली आहे.
- मार्च महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केंद्र सरकारकडे अशी मागणी केली होती. या मागणीचा पुनरुच्चार वर्षा गायकवाड यांनी केला असून सर्व संबंधितांना तशा सूचना करण्याबाबत केंद्र सरकारला पुन्हा विनंती केली आहे.
- कोरोनाचा काळ विद्यार्थ्यांसाठी कठीण आणि आव्हानात्मक होता. अशा काळातही विद्यार्थ्यांनी शिक्षण व अभ्यास सुरू ठेवला. शिक्षकांनीही ऑनलाइन पद्धतीने अध्ययन व अध्यापन प्रक्रिया चालू ठेवली. प्रतिकूल परिस्थितीला जिद्दीने सामोरे जाणाऱया राज्यातील शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांच्या जिद्दीला सलाम, अशी प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी दिली.
सीबीएसईच्या धर्तीवर अंतर्गत मूल्यमापन
बारावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याने या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी सीबीएसईच्या धर्तीवर अंतर्गत मूल्यमापन केले जाणार आहे. त्यामुळे सीबीएसईकडून त्यासाठीचे धोरण जाहीर केल्यानंतर राज्यात बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचा विषय सोडवला जाणार आहे. त्यामुळे सीबीएसईच्या धारणाची शिक्षण मंडळ वाट पाहत आहे. याबाबत देशभरात एकसमान धोरण असावे, अशी राज्य सरकारची भूमिका आहे.
मूल्यमापन धोरण, निकालाची तारीख लवकरच
बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापनाचे धोरण व निकालाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. परीक्षा रद्द करण्यापूर्वी आम्ही अनेक तज्ञांशी चर्चा केली आहे. त्यामुळे अचूक असे अंतर्गत मूल्यमापन कसे केले जाईल यासाठीची जबाबदारी ही शिक्षण विभागाची आहे. त्यावर येत्या काही दिवसांत निर्णय होईल. त्यानंतर सीईटीच्या विषयावरही लवकरच चर्चा करून तो विषय हाताळला जाईल. – वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री






























































