स्मृतिगंध – मदर ऑफ दहिसर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> गंगाराम गवाणकर

नुकतेच डॉ. अशोक मुळगावकर यांचे निधन झाले. दहिसर भागातील सर्वश्रुत डॉक्टर अशी ख्याती असणाऱया मुळगावकरांचे नाटक, कला आणि क्रीडा या क्षेत्रांवरही अतोनात प्रेम होते. त्यातूनच दहिसर स्पोर्ट्स फाऊंडेशन ही संस्था आकारास आली. ‘मदर ऑफ दहिसर’ ही त्यांची ओळख म्हणूनच सार्थ ठरते.

डॉ. अशोक मुळगावकर पंचत्वात विलीन झाले ही दुःखद बातमी कळताच आमच्या दहिसर गावावर आणि वैद्यकीय क्षेत्रावर अक्षरशः शोककळा पसरली. पन्नास वर्षांपूर्वी डॉ. अशोक मुळगावकरांनी दहिसर गावात एका चाळीतून स्त्रीरोग तज्ञ म्हणून वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली. मातृत्वाच्या पवित्र भावनेने सुरू केलेल्या वैद्यकीय व्यवसायात त्यांना इतके प्रचंड यश आणि प्रसिद्धी मिळत गेली की दहिसर गावातील चाळीतील दवाखाना अपुरा पडायला लागल्यावर स्वकर्तृत्वावर त्यांनी दहिसर पूर्वेला स्वतःचं ‘अभिनव सुश्रुत’ हे अद्ययावत तीन मजली हॉस्पिटल सुरू केलं. या इस्पितळात दहिसर-बोरिवली पसिरातीलच नव्हे तर भाईंदर, पालघर, डहाणू, केळवे-माहीम येथील पेशंट येऊ लागले. त्याचे कारण त्यांच्या हाताला ‘गुण’ होता. वाणीत ममत्व होते आणि वैद्यकीय व्यवसाय हा एक पवित्र धर्म म्हणून ते मानत होते. चाळीस वर्षांपूर्वी वाहनांची कमतरता असताना खेडय़ापाडय़ातून अडलेल्या पेशंटकडे जाताना रात्री अपरात्री त्यांना होडीतूनही प्रवास करावा लागला. आर्थिकदृष्टय़ा अडलेल्या माता-भगिनींना त्यांनी कधीही पैशासाठी अडवून धरले नाही. कधी कधी डॉक्टरांना लागोपाठ पाच-सात शस्त्रक्रिया करायला लागायच्या. सततचं रक्त पाहून डॉक्टर म्हणायचे ‘मी डॉक्टर आहे की खाटीक?’ पण क्षणभराने स्मित हास्य करीत भाष्य करायचे, ‘मातेच्या चेहऱयावरील सुखरूप सुटल्याचा आनंद आणि बच्चूचं टॅहॅ कानावर पडले की रक्ताच्या ठिकाणी मला मातेचं दूध दिसायला लागतं.’ (बाळाला ते बच्चू म्हणायचे.) दुर्दैवाने एखादा ‘बच्चू’ दगावला तर ते अन्नाला स्पर्श करायचे नाहीत. मातेचे हृदय लाभलेल्या डॉ. अशोक मुळगावकरांनी त्यांच्या पन्नास वर्षांच्या वैद्यकीय सेवेत कमीतकमी दहा हजार प्रसूती यशस्वीरीत्या पार पाडल्या. म्हणूनच आमचा दहिसर परिसर त्यांना ‘मदर ऑफ दहिसर’ म्हणत असे. ‘मे’ महिन्याच्या 16 तारखेला त्यांनी वयाची 75 पार केली होती. 18 तारखेला मी त्यांच्याशी शेवटचं बोललो. ‘श्वास घ्यायला त्रास होतोय’ हे त्यांचे शेवटचं वाक्य.

1966 साली टोपीवाला मेडिकल कॉलेजचे ते विद्यार्थी असताना त्यांचा माझा परिचय झाला होता. आय.एम.ए.च्या एकांकिका स्पर्धेत त्यांनी भाग घेतला होता. लीलाधर कांबळींनी लिहिलेल्या ‘असं घडलं रामायण’ या एकांकिकेत त्यांनी ‘अण्ण्या’ ही अफलातून भूमिका केली होती. ती इतकी गाजली की त्या भूमिकेवरून मित्रपरिवारात त्यांना ‘अण्णा’ हे टोपण नाव पडलं. मी त्यांना अण्णाच म्हणत असे.

वैद्यकीय व्यवसाय हा त्यांचा पेशा असला तरी कलाप्रांत हा त्यांचा आवडता छंद होता. वैद्यकीय व्यवसाय यशस्वीपणे पार पाडत असताना नाटकाचा छंदही ते जोपासत होते. त्यासाठी त्यांनी आय.एन.टी.च्या ‘द बकेट’ या नाटकात सतीश दुभाषी आणि अमोल पालेकर यांच्याबरोबर महत्त्वाची भूमिकाही पार पाडली होती.

1980 च्या आसपास ‘दुसरा करार’ नावाचं नाटकही त्यांनी निर्माता म्हणून रंगमंचावर आणलं होतं. त्या नाटकात सतीश पुळेकर, मनोज जोशी, विवेक लागू आणि रिमा लागू भूमिका करीत होते. दूरदर्शनसाठी केलेल्या माझ्या ‘वर भेटू नका’ या नाटकात त्यांनी आप्पा चेंदवणकरांची अफलातून भूमिका केली होती. हे नाटक अरुण नलावडेंनी दिग्दर्शित केलेले होते आणि विशेष म्हणजे शरद पोंक्षे यांनी इंद्राची भूमिका केली होती. याच नाटकाने शरद पोंक्षेंनी व्यावसायिक रंगमंचावर प्रवेश केला. निर्माते डॉ. मुळगावकरच होते. ‘रंगकर्मी’ म्हणून रंगमंचाशी आपलं जीवाभावाचं नातं आहे हे त्यातून प्रतित होत होतं.

सुप्रसिद्ध कादंबरीकार आणि नाटककार कै. जयवंत दळवी यांच्याशी त्यांची घनिष्ट मैत्री होती. दळवी बोरिवलीत राहायला आल्यावर आम्ही तिघे वारंवार दळवींच्या घरी भेटायचो. दळवींना अस्वस्थ वाटायला लागलं की ते डॉ. मुळगावकरांनाच बोलवायचे. दळवींनी त्यांच्या शेवटच्या क्षणी पहाटे डॉक्टरांनाच बोलावून घेतलं आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की या थोर साहित्यकाराने डॉ. मुळगावकरांच्या मांडीवरच शेवटचा श्वास घेतला. त्या क्षणाचं वर्णन करताना डॉक्टर अक्षरशः ‘बच्चू’ गेल्याच्या दुःखाने रडायचे.

कला आणि क्रीडा या क्षेत्रावर डॉक्टरांचं अतोनात प्रेम होतं. त्यांच्या हॉस्पिटलच्या गच्चीतून समोरील दोन-तीन एकर पडीक जागा त्यांना दिसायची. मला म्हणायचे, ‘गवाणकरांनू ही पडीक जागा म्हणजे माझा एक स्वप्न आसा. हैसर दहिसर स्पोर्टस् फाऊंडेशन व्हौंक व्हया.’

आणि ते स्वप्न एकदाचे मूर्त स्वरूपात आलं. त्याचं कारण आमच्या दहिसर गावचे शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांची त्यांना साथ मिळाली. दोघांनी मिळून कंबर कसली. शेकडो लॉऱया माती टाकून दलदलीचं रूपांतर हिरवळीत केलं गेलं आणि ‘दहिसर स्पोर्टस् फाऊंडेशन’ मोठय़ा दिमाखात उभं राहिलं. डॉक्टर त्याचे प्रमुख कार्यवाह आहेत. या दहिसर स्पोर्टस् फाऊंडेशनने अनेक क्रीडा प्रांतातील अनेक क्रीडापटूंना राष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवलं. त्याचं श्रेय ते स्वतःकडे न घेता डॉ. विनोद घोसाळकर यांना देत. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा. डॉ. मुळगावकरांनी आपल्या कुडाशे या मूळ गावापासून ते दहिसरपर्यंत अनेक अनाथ मुलांना दत्तक घेतलं. अनेक रंगकर्मींना, काही नाटय़संस्थांना सढळ हस्ते मदत केलीय, कुठलाही गाजावाजा न करता.

त्यांच्या हॉस्पिटलच्या गच्चीतून ‘दहिसर स्पोर्टस् फाऊंडेशनची हिरवळ स्पष्ट दिसते. आज ती हिरवळ सद्गदीत अंतःकरणाने म्हणत असेल ‘डॉक्टर तुमच्या पवित्र आत्म्याला शांती मिळण्यासाठी आमचा हिरवटपणा आम्ही सदोदित जपून ठेवू.’