माहसीर मासा नामशेष होण्याचा धोका टळला, आययूसीएनच्या लाल यादीतून नाव वगळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोडय़ा पाण्यात पोहताना सोनेरी किरणांप्रमाणे भासणारा ‘माहसीर’ मासा गेली अनेक वर्षे नामशेष होण्याच्या मार्गावर होता. मात्र राज्यात मागील 50 वर्षांपासून संवर्धन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचे फलित म्हणजे या माशांची संख्या वाढली आहे. निळे कल्ले असलेल्या माहसीर प्रजातीला अर्थात इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरच्या (आययूसीएन) ‘रेड लिस्ट’मधून वगळण्यात आले आहे. त्यामुळे ही प्रजाती आता काहीशी सुरक्षित असल्याचा दावा केला जात आहे.

टाटा पॉवरने माहसीरच्या संरक्षण आणि संवर्धनाचे काम हाती घेतलेले आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशा या माशांची संख्या घटत असल्याने पर्यावरणप्रेमी चिंतित होते. त्यांनी मत्स्य विभागाशी संपर्प साधला. त्यानंतर गेली 50 वर्षे टाटा पॉवरच्या कर्मचाऱयांकडून माहसीर माशाचे संवर्धन करण्यात येत आहे. सांडपाणी, अनियंत्रित मासेमारी, अंडी आणि छोटय़ा पिलांची शिकार आदींमुळे हा मासा संपुष्टात येत असल्याचे दिसून आले होते.

15पैकी 5 प्रजातींना धोका

नद्या, तलावांसह हिमालय आणि सह्याद्री पर्वतरांगांमधील भागांत माहसीर मासा आढळून येत आहे. मात्र मोठा आकार आणि देखणं रूप यामुळे त्याची शिकार वाढली. शिकाऱयांच्या जाळ्यात माहसीर सहज सापडणारे सावज ठरले. याशिवाय वाढत्या जलप्रदूषणामुळेही माशाला धोका निर्माण झाला. परिणामी देशभरातील ‘माहसीर’च्या 15पैकी 5 प्रजाती नामशेष होण्याचा धोका आहे.

संवर्धनासाठी प्रयत्न

लोणावळा येथील टाटा पॉवरच्या वाळवण प्रकल्पाजवळ केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्थेच्या सहयोगाने माहसीर प्रजनन केंद्र स्थापन करण्यात आले. यात निळे आणि सोनेरी कल्ले असणाऱया ‘माहसीर’वर लक्ष केंद्रीत केले. त्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सध्या निळ्या कल्ल्याच्या माहसीरला रेड लिस्टमधून वगळण्यात आले आहे. आजच्या पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ही माहिती देण्यात आली. सोनेरी माहसीर अजूनही त्या यादीत आहे. लवकरच तोदेखील त्यामधून बाहेर पडेल, अशी खात्री पंपनीच्या वतीने देण्यात आली आहे.