
‘शिवसेना मनापासून काम करत आहे. भाजपसोबत असतानाही शिवसेनेने काम केले. युतीमधून बाहेर पडण्याचा विचार आमचा नव्हता. पण आता आघाडी झाली आहे. चांगली कामे करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आपण कुणीही भविष्यवेत्ते नाही; पण काम करण्याची जिद्द असेल तर युती टिकली तशी आघाडीही टिकेल’ असा ठाम विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.
महाराष्ट्रातील सद्यस्थिती आणि भविष्य यांचा वेध घेणाऱया ‘दृष्टी आणि कोन’ या ‘लोकसत्ता’ आयोजित वेबिनारमध्ये संपादक गिरीश कुबेर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. त्याप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्यांवर आपली मते स्पष्टपणे मांडली. महाविकास आघाडी किती काळ एकत्र राहील अशा प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी, पुढच्या कित्येक वर्षांसाठी चांगली कामे होतील तशी आघाडी टिकवू शकतो असे सांगितले. ‘आघाडीतील तिघांच्या मनातला हेतू स्वच्छ आणि प्रामाणिक असेल तोपर्यंत आघाडी टिकायला काय हरकत आहे? सरकार बनले तेव्हा सर्वात नवखी व्यक्ती मुख्यमंत्री म्हणजे मी होतो. मी कधीच विधिमंडळात गेलो नव्हतो. असे असतानाही सर्वांच्या सहकार्याने सरकार चांगले काम करत आहे’ असेही ते म्हणाले.
युती का तुटली याचे उत्तर शोधावे लागेल
शिवसेना-भाजप एकत्र येणार का? असेही उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आले. त्यावर या प्रश्नाचे उत्तर दोन्ही पक्ष वेगळे का झाले यामध्ये आहे असे ते म्हणाले. हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर आम्ही वाईट काळात एकत्र होतो. मग चांगलं असताना वेगळे का झालो? एका विचाराने झालेली युती तुटली का? याचे उत्तर शोधावे लागेल असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
भुकेलेल्याला भाकरी हा धर्म, साधुसंतांची शिकवण हे हिंदुत्व
धर्म राजकारणापासून दूर ठेवायला हवा या मुद्यावर बोलताना उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, ‘प्रबोधनकार ठाकरे, संत गाडगेबाबा यांनी जो सांगितला आहे तो धर्म. भुकेलेल्याला भाकरी आणि तहानलेल्याला पाणी. साधुसंतांनी जी शिकवण दिली आहे ते हिंदुत्व. साधुसंतांनी जगावे कसे याचा धर्म सांगितला आहे. अशा धर्माचा आधार घेऊन राजकारण करण्यात चूक काय?’
केवळ निवडणुकीपुरते नको, देशासाठी एकत्र या!
व्यापक प्रयत्न म्हणून ममता, जगमोहन रेड्डी यांना हाक देताय, मग संभाव्य खेळाडू मनसे असू शकतो का? या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘कोरोना संकटात देशातील, राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र यायला हवे. देश जगला तर आपण जगू. केवळ निवडणुकीपुरते नको, देशासाठी एकत्र या. देश चांगला राहिला तर निवडणुका होतील आणि मग तुमची स्वप्ने पूर्ण करा.’ सरकारवर सतत आरोप करणाऱया विरोधकांचा समाचारही त्यांनी घेतला. ‘सरकार पाडापाडीचे धंदे थांबवा आणि जनतेचा विचार करा. लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत. खुर्ची देणारे जगले नाहीत तर तुमच्या खुर्चीवर बसून तुम्ही काय करणार?’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
…तर देशात अराजक येईल
देशासमोर आणि महाराष्ट्रासमोर उभे ठाकलेले कोरोनाचे संकट आणि त्याचा सामना करणारे राजकीय पक्ष याबद्दलही उद्धव ठाकरे यांनी आपले मत मांडले. ‘कोणत्याही राजकीय पक्षाने सत्तालोलूप होऊन वाट्टेल त्या मार्गाने सत्ता मिळवली आणि जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष दिले नाही तर जनता विरोधात जाईल. कोरोना संकटाच्या काळातही आपण राजकारण करत राहिलो, एकमेकांवर आरोप करत राहिलो आणि जनतेकडे दुर्लक्ष केले तर देशात अराजक येईल’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी कायद्याची लढाई कायद्याने लढावी लागणार
n मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बोलतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका सविस्तरपणे मांडली.
‘मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा एकमताने मंजूर करण्यात आला होता. त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले गेले, पण तिथे आपण जिंकलो. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले. तिथेही आपण बाजू मांडली.
n उच्च न्यायालयात ज्या वकिलांनी बाजू मांडली होती त्यांनीच सर्वोच्च न्यायालयातही चांगली बाजू मांडली. गायकवाड आयोगाच्या शिफारशी सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवण्यात आल्या होत्या. केंद्र सरकारचे म्हणणेही सर्वोच्च न्यायालयाने डावलले आहे.
n आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही हेच न्यायालयाने म्हटले आहे. असे असतानाही आपण आरक्षण दिले हा मुद्दा आहे.
n मराठा आरक्षण कायदा आधी केला गेला की घटनादुरुस्ती आधी केली गेली? 11 ऑगस्ट 2018 रोजी 102 वी घटनादुरुस्ती अमलात आणली गेली आणि महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण कायदा केला 30 नोव्हेंबर 2018 रोजी. मग आम्ही सत्तेत असतानाही आमची दिशाभूल केली गेली असा आरोप मी करू का? पण मी करणार नाही. मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलोय म्हणून मला ते शोभणार नाही.
n सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. मराठा समाजाला असे आवाहन करायचे आहे की, सरकार विरोधात असते तर तुम्ही रस्त्यावर उतरायला हरकत नव्हती. पण सरकार तुमचे ऐकत आहे, मग आपण सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहात का? मराठा समाज समंजस आहे. त्यांना कल्पना आहे की, आताच्या आणि मागच्या सरकारमध्ये सर्वांनी आरक्षण देण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. त्याला न्यायालयात आव्हान दिले गेल्याने आता कायद्याची लढाई कायद्याने लढावी लागणार आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेणाऱयांना मला हेच सांगायचे आहे की, आपण सरकारविरोधात नाही, तर न्यायालयाविरोधात रस्त्यावर उतरत आहात.






























































