
कोरोना महामारीच्या संकटात केंद्र सरकारने झालेल्या गोष्टींचे श्रेय घेण्यावरच अधिक लक्ष केंद्रित केले होते. यामुळे कोविड-19 प्रसार रोखण्याकडे मोठय़ा प्रमाणात दुर्लक्ष झाले. मोदी सरकार फक्त श्रेय घेत राहिले आणि देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला, अशी टीका ‘नोबेल’ पुरस्कार विजेते अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी केली आहे.
हिंदुस्थान औषधनिर्मितीच्या बाबतीत समर्थ आहे. त्यामुळे देश कोरोनाच्या साथीचा योग्य प्रकारे सामना करू शकला असता, मात्र सरकारी पातळीवर असलेल्या संभ्रमामुळे आपल्या बलस्थानांकडे आपण लक्ष केंद्रित करू शकलो नाही. केंद्र सरकार जागतिक स्तरावर आपली अशी प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न करत राहिले की हिंदुस्थानच संपूर्ण जगाला वाचवू शकेल, मात्र त्याच कालावधीत देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला आणि देशातील लोक कोरोनाच्या विळख्यात अडकल्याचे अमर्त्य सेन यांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या दुसऱया लाटेचा हिंदुस्थानला जोरदार तडाखा बसला असताना त्याच वेळी ऑक्सिजन आणि लसीच्या तुटवडय़ाचे संकटदेखील देशासमोर उभे राहिले. यावरून याआधी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. फौची यांनी हिंदुस्थानातील कोरोना परिस्थितीवरून परखड भूमिका मांडली होती. त्यानंतर आता अमर्त्य सेन यांनीदेखील केंद्र सरकारच्या कोरोनाविषयक धोरणावर ताशेरे ओढले आहेत.
– हिंदुस्थानात आधीच असलेली सामाजिक असमानता, विकासाचा मंद वेग आणि बेरोजगारी या समस्या कोरोना साथीच्या काळात अजूनच गंभीर झाल्या आहेत.




























































