
तीन वेळची चॅम्पियन आणि टेनिसविश्वातील ताकदवर खेळाडू असलेल्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला फ्रेंच ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. कझाकिस्तानच्या 21 वर्षीय एलिना रिबाकिना हिने सेरेनावर सरळ सेटमध्ये खळबळजनक विजय मिळवला. नवख्या रिबाकिना हिने कारकिर्दीत प्रथमच ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली, हे विशेष.
2016पासून सेरेना अपयशी
21व्या मानांकित एलिना रिबाकिना हिने चौथ्या फेरीत 7व्या मानांकित सेरेना विल्यम्सला 6-3, 7-5 असा पराभवाचा धक्का दिला. रिबाकिनाने एक तास 17 मिनिटांत सेरेनाचे नोमोहरम केले. या पराभवाबरोबर सेरेनाचे 24वे ग्रॅण्डस्लॅम जेतेपद जिंकण्याचे स्वप्नही भंगले. 2016नंतर सेरेना विल्यम्सला फ्रेंच ओपनमध्ये उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे जाता आलेले नाही.
मेदवेदेव, ज्वेरेवची आगेकूच
पुरुष एकेरीत डॅनिल मेदवेदेव, अलेक्झांडर ज्वेरेव यांच्यासह स्टेफानोस सितसिपास यांनीही अंतिम आठमध्ये प्रवेश केला. अलेझांड्रो डेविडोवीच यानेही कारकिर्दीत प्रथमच ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. मेदवेदेवने खिस्टियन गारीनचा 6-2, 6-1, 7-5 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. स्टेफानोस सितसिपासने पाब्लो बुस्टाला 6-3, 6-2, 7-5 अशी धूळ चारली. जागतिक क्रमवारीत 45व्या स्थानी असलेल्या स्पेनच्या अलेझांड्रो डेविडोवीचने अर्जेंटिनाच्या फेडेरिको डेलबोनीसचा चुरशीच्या लढतीत 6-4, 6-4, 4-6, 6-4 असा पराभव केला.























































