
यावर्षी 100 टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर आणि गेल्या दोन वर्षांपूर्वी आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर सांगलीकरांना सज्ज ठेवण्यासाठी आज कृष्णा नदीपात्रात आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानतर्फे हे प्रशिक्षण देण्यात आले.
दोन वर्षांपूर्वीच्या महापुरामध्ये सांगलीसह पश्चिम महाराष्ट्राला मोठे नुकसान सहन करावे लागले होते. त्यावेळी सांगलीतील अनेक सामाजिक कार्यकर्ते या बचावकार्यात सहभागी झाले होते. मात्र, योग्य प्रशिक्षणाअभावी बरेचजण इच्छा असूनही बचावकार्यात सहभागी होऊ शकले नव्हते. दरम्यान, या वर्षीसुद्धा हवामान खात्याने 100 टक्के पावसाची शक्यता वर्तवली असल्याने पुन्हा एकदा सांगलीसह पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानमार्फत आपत्ती नियोजन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता.
या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये रॉयल कृष्णा बोट क्लबचे दत्ता पाटील व विश्वसेवा फाउंडेशनचे विकास बोळाज यांनी प्रत्यक्ष नदीत प्रात्यक्षिक दाखवत उपस्थितांना मार्गदर्शन केले व भूलशास्त्र्ा तज्ञ संघटना सांगली-मिरजतर्फे डॉ. मोहन पाटील, डॉ. स्मिता ऐनापुरे, डॉ. विनायक पाटील यांनी बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला कसे ओळखायचे, यापासून त्याच्यावर प्राथमिक उपचार ते दवाखान्यात दाखल करेपर्यंत कसे उपचार करीत जीव वाचवायचा याचे प्रशिक्षण यावेळेस दाखवून मार्गदर्शन केले.
यावेळी सांगली शहर पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, नगरसेवक मंगेश चव्हाण व नगरसेवक अभिजित भोसले आणि अग्निशमन दलाचे प्रमुख चिंतामणी कांबळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कडणे दादा यांनी केले. अजिंक्य बोळाज, प्रकाश निकम, सचिन देसाई, अमोल बोळाज, युवराज जाधव, अक्षय रेपे, ओंकार जाधव, मंगेश कांबळे, दिगंबर साळुंखे, संग्राम घोरपडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.



























































