
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या रयत व संस्थापक पॅनेलचे मनोमिलन चर्चेला माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पूर्णविराम दिला आहे. आता या चर्चेत मी सहभागी होणार नाही. सभासद निर्णय घेतील, अशी माहिती आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान ‘कृष्णा’ची लढत तिरंगी होणार हे निश्चित झाले आहे.
कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये दुरंगी की तिरंगी लढत होणार हे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचे गुऱहाळ सुरू होते. रयत पॅनेलचे इंद्रजित मोहिते, संस्थापक पॅनेलचे अविनाश मोहिते यांच्यामध्ये चर्चेच्या अनेक बैठका झाल्या. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, जिल्हा परिषद सदस्य ऍड. उदयसिंह पाटील यांच्या मध्यस्थीने मनोमिलन घडविले जात होते.
रविवारी रात्री झालेल्या बैठकीत कोणताच पर्याय निघत नसल्याने मनोमिलन प्रक्रियेतून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढील जे काही असेल ते कारखान्याचे सभासद निर्णय घेतील, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.


























































