सामना प्रभाव – राज्यातील बोगस लॅबवर अंकुश ठेवण्यासाठी स्थापलेल्या तज्ञांच्या समितीत पॅथॉलॉजिस्टचा समावेश होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील बोगस लॅबवर अंकुश ठेवण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी दहा तज्ञांची समिती स्थापन करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता, पण या समितीमध्ये एकाही पॅथॉलॉजिस्टचा समावेश नसल्याचा आक्षेप पॅथॉलॉजिस्ट असोसिएशनने घेतला होता. त्यामुळे या समितीला स्थगिती देण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. आता या समितीमध्ये पॅथॉलॉजिस्टचा समावेश होणार आहे.

बोगस पॅथॉलॉजी लॅबवर अंकुश ठेवण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने स्थापन केलेल्या समितीमध्ये एकही पॅथॉलॉजिस्ट नसल्याचे वृत्त दै. ‘सामना’मध्ये 3 जून रोजी प्रसिद्ध झाले होते. या वृत्तानंतर अखेर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबतच्या पूर्वी प्रसिद्ध केलेल्या जीआरला स्थगिती दिली आहे. आता या समितीमध्ये पॅथॉलॉजी या विषयातील सर्व घटकांचा समावेश करून समितीची पुनर्रचना करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्याबाबतचा नवीन जीआर प्रसिद्ध केला आहे.

आक्षेप काय होता?

महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्ट या संघटनेने या दहा जणांच्या समितीवरच आक्षेप घेतला होता. दहा जणांच्या या समितीमध्ये राज्याचे अतिरिक्त अभियान संचालक, आरोग्य सेवा सहसंचालक, आरोग्य सेवा उपसंचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या रक्तविषयक विभागाचे सहाय्यक संचालक यांच्या अन्य पाच सदस्यांचा समावेश होता, पण या अन्य पाच सदस्यांमध्ये डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी म्हणजे केवळ डिप्लोमाधारक व्यक्ती होत्या. पॅथॉलॉजी या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या एकाही पॅथॉलॉजिस्टचा समावेश नव्हता. त्यामुळे या समितीत पॅथॉलॉजिस्ट, महाराष्ट्र मेडिकल काwन्सिलवरील डॉक्टरांचा समावेश केला तरच बोगस लॅबला आळा घालणारी मार्गदर्शक तत्त्वे तयार होतील अशी मागणी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संदीप यादव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्यामुळे पूर्वी स्थापन केलेल्या समितीला स्थगिती देण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे.