
कोरोना नियंत्रणासाठी मुंबई महापालिका राबवत असलेले ‘मुंबई मॉडेल’ आणि त्यानुसार सुरू असलेले काम हे देशातील सर्वेत्तम काम आहे. कोरोना काळात रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी तातडीने कंट्रोल रूम-डॅशबोर्ड, परिस्थिती अधिक व्यापक आणि सुनियोजित रितीने हाताळण्यासाठी 24 वॉर्डनुसार प्रत्येक वॉर्ड ऑफिसमध्ये वॉररूम तसेच मास्क, सॅनिटायझर, अन्नधान्य यासह अनेक जीवनोपयोगी साहित्य लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी पालिका आणि खासगी संस्थांचे एकत्रितपणे सुरू असलेले काम हे कोरोना काळातील सर्वेत्तम काम, अशा शब्दांत प्रजा फाऊंडेशनने मुंबई महापालिकेवर स्तुतिसुमने उधळली आहेत. कोरोना कायमचा गेल्यानंतरही मुंबईकरांना अधिक चांगल्या आणि प्रभावी नागरी सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेचे हे मुंबई मॉडेल उपयोगी पडू शकते, असा आशावाद फाऊंडेशनने व्यक्त केला.
प्रजा फाऊंडेशनने आज ‘मुंबईतील नागरी सेवांबाबतची सद्यस्थिती-2020-21’ या अहवालाचे प्रकाशन केले. यात पाणी, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन याबरोबरच कोरोनाविरोधातील लढाईत मुंबई महापालिका राबवत असलेल्या मुंबई मॉडेलची माहिती दिली. यात प्रामुख्याने कोरोना काळातील महापालिकेच्या कामाचा गौरव केला. मुंबईत कोरोना काळात रुग्णसंख्या वाढलेली असताना नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेने यंत्रणेची अत्यंत कुशलतेने हाताळणी केली. कोरोना रुग्णांना वेळेत बेड्स, रुग्णवाहिका मिळण्यासाठी कंट्रोल रूम, डॅशबोर्ड, 1916 हेल्पलाइन क्रमांक, त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून डेटा तयार करून कंट्रोल रूमची वॉर्डनुसार विभागणी केली तसेच पालिका खासगी संस्थांना बरोबर घेऊन जीवनावश्यक साहित्य सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी काम करत आहे. या सगळ्या बाबी भविष्यातही नागरी सुविधा आणखी चांगल्या पद्धतीने देण्यासाठी उपयोगी पडतील, अशी आशा या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. या आधी सर्वोच्च न्यायालय, निती आयोग, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई महापालिका राबवत असलेल्या ‘मुंबई मॉडेल’चे कौतुक केले आहे. दरम्यान, मुंबई महापालिका मुंबईकरांना अत्यंत माफक दरात नागरी सुविधा उपलब्ध देते. मात्र पाणी, स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनावर अधिक भर द्यावा, असे मत या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे.


























































