
कोरोनाला यशस्वीपणे रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने ‘ट्रेसिंग, ट्रकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटिंग’ या चतुःसूत्री प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह वाढत्या रुग्णसंख्येसाठी जम्बो रुग्णालयाची उभारणी, ऑक्सिजन सुविधा तर पालिका, राज्य व खासगी रुग्णालयांत केंद्रीय बेड नियोजन, रुग्णवाहिकांची उपलब्धता आणि या सर्वांवर थेट नियंत्रण ठेवण्यासाठी वॉररूम आणि डॅशबोर्डच्या सुविधा उभारल्या.
कोरोना नियंत्रणाचे हे ‘मुंबई मॉडेल’ आता दिल्लीत राबवले जाणार असून कोरोनापासून दिल्लीकरांची सुटका करणार आहे. दिल्ली सरकारच्या प्रतिनिधींनी नुकताच मुंबई अभ्यास दौरा करून ‘मुंबई मॉडेल’ची माहिती घेतली आणि दिल्लीत ‘मुंबई मॉडेल’ राबवणार असल्याचे सांगितले.
कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने राबवलेल्या ‘मुंबई मॉडेल’ची दखल सर्वेच्च न्यायालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाची आर्थिक धोरणे ठरवणारा ‘निती’ आयोग तसेच केंद्रीय आरोग्य खात्यानेही घेतली. नुसती दखल घेऊन न थांबता सर्वेच्च न्यायालय आणि केंद्रीय आरोग्य खात्याने कोरोना नियंत्रणाचे खात्रीदायक ‘मुंबई मॉडेल’ देशभर राबवा, अशी शिफारस कोरोनामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेल्या दिल्लीसह अनेक राज्यांना केली. मुंबईकडे पाहा, मुंबई पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना भेटून ‘मुंबई मॉडेल’ समजून घ्या, असा शहाणपणाचा सल्लाही दिला होता. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात या अभ्यास दौऱयाचे नियोजन करण्यात आले तर अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली संगणकीय सादरीकरण व सविस्तर चर्चा करून माहिती घेण्यात आली. यावेळी दिल्ली सरकारच्या आरोग्य खात्याचे ज्येष्ठ अधिकारी डॉ. संजय अगरवाल आणि डॉ. धर्मेंद्र कुमार यांच्यासह टीम उपस्थित होती. तसेच त्यांनी गोरेगाव येथील नेस्को जम्बो कोरोना सेंटर आणि अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन व्यवस्थापनाची माहिती घेतली.
अल्पावधीत उभारली जम्बो कोरोना रुग्णालये
मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांना परिणामकारक औषधोपचार मिळावेत यासाठी महापालिकेने अत्यंत अल्प कालावधीत तात्पुरत्या स्वरूपातील सहा जम्बो कोरोना रुग्णालये उभारली. या सहा रुग्णालयांमध्ये तब्बल 8 हजार 915 बेड्स असून चार हजारांपेक्षा अधिक मनुष्यबळ या ठिकाणी अव्याहतपणे कार्यरत आहे. गोरेगावमधील नेस्को कोरोना केंद्राला प्रतिनिधींनी भेट दिली. तेथील सोयीसुविधा, विविधस्तरीय उपाययोजना यासह ‘डायलिसिस बेड’, ‘आयसीयू बेड’ आणि ‘ऑक्सिजन बेड’ याबाबतही त्यांनी तपशीलवार माहिती जाणून घेतली. मुंबईच्या धर्तीवर दिल्लीमध्येदेखील जम्बो रुग्णालये उभारण्यात येणार आहेत.
वॉर्ड वॉररूमकडून उत्तम व्यवस्थापन
दिल्ली राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी पालिका करत असलेले कोरोना रुग्ण व्यवस्थापन आणि ‘बेड अलॉटमेंट’ समजावून घेण्यासाठी ‘डी’ व ‘के-पूर्व’ या दोन विभागांच्या नियंत्रण कक्षांना अर्थात ‘वॉर्ड वॉररूम’ना भेट दिली. ज्या व्यक्तींना कोविड बाधा झाली आहे त्यांचे वैद्यकीय चाचणी अहवाल हे सर्वप्रथम पालिकेच्या ‘वॉररूम’कडे प्राप्त होतात. त्यानंतर रुग्णांशी दूरध्वनी संवाद साधला जातो व त्यांचे प्राथमिक समुपदेशनदेखील केले जाते. त्यानंतर आवश्यकतेनुसार महापालिकेची चमू या व्यक्तीच्या घरी जाऊन आवश्यक ती वैद्यकीय तपासणी करते. महापालिकेने ‘वॉर्ड वॉररूम’च्या माध्यमातून साध्य केलेली विकेंद्रित सुव्यवस्था पाहून दिल्ली राज्य सरकारची टीम भारावून गेली.
ऑक्सिजनचा सुयोग्य वापर
मुंबई पालिकेच्या अखत्यारीतील 1 हजार 800 खाटांच्या ‘सेव्हन हिल्स’ रुग्णालयात 18 मेट्रिक टन ‘ऑक्सिजन’ पुरेसा असतो. मात्र तेवढेच बेड्स संख्या असणाऱया 1 हजार 800 ‘बेड’च्या दिल्ली सरकारच्या अखत्यारीतील एका रुग्णालयात दररोज 32 मेट्रिक टन ‘ऑक्सिजन’ लागतो. पालिकेने ऑक्सिजनचा सुयोग्य वापर करून प्रभावी रुग्णसेवा कशी साध्य केली आहे, याबाबतची माहितीदेखील प्रतिनिधींनी घेतली.
खासगी रुग्णालयांतील 80 टक्के बेड्स वितरण महापालिकेकडे
मुंबईतील सर्व खासगी रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागातील सर्व खाटा आणि इतर खाटांपैकी 80 टक्के खाटांचे वितरण मुंबई महानगरपालिकेच्या ‘वॉर्ड वॉररूम’ द्वारेच करण्यात येत असलेल्या व्यवस्थेची दिल्ली राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी प्रशंसा केली. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांनीदेखील या व्यवस्थेत सकारात्मक व सक्रिय योगदान दिल्याचे पाहून आपण भारावून गेलो आहोत, अशा भावनाही या टीमने व्यक्त केली.
































































