
वरुणराजाचे वेळेवर आगमन झाल्यामुळे बळीराजा आनंदित झाला असताना राज्य सरकारने आता शेतकऱयांचा आनंद द्विगुणित केला आहे. तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱयांना शून्य टक्के व्याज दराने म्हणजेच बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. प्रामाणिकपणे पीक कर्ज फेडणाऱया असंख्य शेतकऱयांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वित्त मंत्री अजित पवार यांनी तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने देण्याची घोषणा केली होती. त्यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीची मोहर उमटवण्यात आली.
कोणते निर्णय घेतले
- पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱया शेतकऱयांना आता तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी शून्य टक्के दराने व्याज आकारणी.
- एक लाख ते तीन लाख रुपयांच्या कर्जमर्यादेत विहीत मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास सध्याच्या एक टक्के व्याजदरात आणखी दोन टक्के व्याज दर सवलत देण्याचा निर्णय
राज्य सरकार देत असलेली व्याज दर सवलत तीन टक्के व केंद्र शासनाकडून मिळणारी तीन टक्के व्याज सवलत या दोन्हीचा एकत्रित फायदा शेतकऱयांना मिळणार आहे.
कृषी उत्पन्न वाढीसाठी शेतकऩयांना आधुनिक बियाणे, खते, औषधे खरेदी करता येतील. यातून शेती उत्पादनात वाढ होईल. तसेच व्याज सवलत मिळण्यासाठी शेतकरी पीक कर्जाची मुदतीत परतफेड करतील.

























































