ऑनलाइन फसवणूक महागात, पेट्रोल पंप चालकाला अटक; साकीनाका पोलिसांची राजस्थानमध्ये फिल्डिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑनलाइन फर्निचर विक्रीच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी राजस्थान येथील पेट्रोल पंपाच्या मालकाला साकीनाका पोलिसांनी अटक केली. हिरेंद्र चौधरी असे त्याचे नाव असून त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी साकीनाका पोलिसांच्या विशेष पथकाने राजस्थानमध्ये फिल्डिंग लावली होती. शनिवारी चौधरीला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणून त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार हे अंधेरी परिसरात राहत असून त्यांनी काही महिन्यांपूर्वी घरातील फर्निचर विक्रीसाठी ओएलएक्सवर जाहिरात अपलोड केली होती. ती जाहिरात पाहिल्यावर एका ठगाने तक्रारदारांना फोन करून ते फर्निचर विकत घ्यायचे असल्याच्या भूलथापा मारल्या. फर्निचरचे पैसे ऑनलाइन अप्सने पाठवतो असे सांगून तक्रारदाराच्या मोबाईलवर क्युआर कोड पाठवला. क्यूआर कोड स्कॅन केल्यावर तक्रारदाच्या खात्यातून 1 लाख रुपये काढले गेले.

परिमंडळ 10 चे पोलीस उपायुक्त महेश रेड्डी यांनी वरिष्ठ निरीक्षक बळवंत देशमुख यांच्या पथकातील उप निरीक्षक सुनीता भोसले, जगताप, पांढरे, बरडे, चौगुले, पिसाळ यांचे पथक तयार केले. पोलिसांनी फसवणुकीचे पैसे कुठे गेले याची माहिती काढली आणि हिरेंद्रच्या मुसक्या आवळल्या.