
खाजगी प्रवासी बस आणि क्रुझर जीपचा जालन्यातील अंबड चौफुलीजवळ रविवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून आठ प्रवासी जखमी झाले आहेत. कदीम जालना पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील चांदस येथील 9 प्रवासी क्रुझर जीपने जालन्यातील रामनगर साखर कारखाना येथे लग्नकार्यासाठी जात होते. या जीपला यवतमाळहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसने जालना शहरातील अंबड चौफुलीजवळ जोरदार धडक दिली. बसमध्ये 35 प्रवासी होते. बसने धडक दिल्यानंतर जीप तीन वेळा उलटून रस्त्याच्या कडेला पडली. अपघातात खाजगी बसचे नुकसान झाले आहे.
या अपघातात जीपमधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. स्वाती अजय काळे (वय30) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर आठ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एका खाजगी आणि जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धोंडीराम रामराव तांबवे (42),सागर अरविंद शेंडगे (27),आनंद उत्तम काळे (21), प्रियांका सागर शेंडगे (22),सविता धोंडीराम तांबवे(35),सार्थक अजय काळे (8),राजवीर सागर शेंडगे (5), राजनंदिनी सागर शेंडगे (3, सर्व रा. चांदस ता. माढा, जि.सोलापूर) हे जखमी झाले आहेत.
अपघातात खाजगी बसचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणताही प्रवासी जखमी झालेला नाही. घटनेची माहिती मिळताच कदीम जालना पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले.
























































