‘लाल परी’ गेली गावाला…बेस्टवर वाढला प्रवाशांचा भार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना साथीच्या काळात लोकल ट्रेनवर निर्बंध असताना मुंबई आणि आजूबाजूच्या जिह्यांतील अत्यावश्यक वर्गातील प्रवाशांची वाहतूक करणाऱया ‘बेस्ट’ला ‘लाल परी’ एसटीची साथ मिळाली होती. आता एसटी महामंडळाने या ‘लाल परी’ला पुन्हा गावी पाठविले आहे. त्यातच लोकलमध्ये अजूनही सर्वसामान्यांना प्रवेश बंदी असल्याने सेकंड लाईफलाइन बेस्ट आता एकटी पडल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षी कोरोना साथीच्या पहिल्या लाटेवेळी लोकल सेवा ठप्प असताना अत्यावश्यक वर्गातील प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी बेस्टच्या मदतीला ‘लाल परी’ अर्थात एसटी महामंडळाच्या गाडय़ा  धावून आल्या होत्या. एसटी महामंडळाने जवळपास एक हजार गाडय़ा बेस्टला भाडय़ाने दिल्या होत्या.

एसटी महामंडळाने ग्रामीण भागात आपली सेवा सुरू करताना या आपल्या गाडय़ा पुन्हा परत घेतल्याने आता बेस्ट एकटय़ाने मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील नोकरदार वर्गाला सेवा देत आहे. बेस्टच्या 3148 बसेस प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे बेस्ट ही एकमेव आधार ठरली आहे.

राज्य सरकारने ‘मिशन ब्रेक दि चेन’  निर्बंधांत शिथिलता आणली आहे. कार्यालयात 50 टक्के उपस्थितीस अनुमती देण्यात आल्याने अनेकांना कार्यालयात जाण्यासाठी बेस्ट सेवेचा आधार उरला आहे. बेस्ट बसेस 100 टक्के क्षमतेने रस्त्यावर धावत असून ‘लाल परी’ बेस्ट सेवेतून हटविण्यात आल्याने प्रवाशांच्या रांगा वाढल्याचे चित्र दिसत आहे.