
अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने केलेल्या जमीन खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. शिवसेनेनेही त्यावरून आक्रमक शब्दांत टीका केली. ती टीका भाजपला चांगलीच झोंबली. भाजपने बुधवारी दादरच्या शिवसेना भवनावर ‘फटकार’ मोर्चा काढला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न करूनही मोर्चेकरी भाजप कार्यकर्ते जवळच्या शिवसेना भवनावर चाल करून गेले. ते पाहून शिवसैनिकांचाही पारा चढला. आपल्या श्रद्धास्थानावर धावून येणाऱया बोगस रामभक्तांना शिवसैनिकांनी भरपेट ‘शिवप्रसाद’ दिला. संतप्त शिवसैनिक आणि शिवसेनेच्या रणरागिणींनी त्यांना चोप चोप चोपले. शिवसैनिकांचा संताप पाहून भाजप कार्यकर्ते अक्षरश: पाय लावून पळाले. जे सापडले त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. ‘फटकार’ला चांगलाच फटका बसल्याने भाजप कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांवरच खोटे आरोप केले आणि गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडला. पोलिसांनी सायंकाळी उशिरा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला.
अयोध्येतील राममंदिरासाठी दोन कोटी रुपयांची जमीन आठ मिनिटांत तब्बल 18 कोटींना खरेदी केल्याचा आरोप ट्रस्टवर होत आहे. यावरून देशभरातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह भाजपवरही टीकेचा भडीमार होत आहे. राममंदिर हा कोटय़वधी हिंदूंच्या श्रद्धेचा विषय असल्याने मंदिर उभारणीच्या कामात पारदर्शकता असावी, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेने मांडली आहे. त्याविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाने आज दुपारी शिवसेना भवनावर ‘फटकार’ मोर्चा काढला. पोलिसांनी हा मोर्चा ‘राजा बढे’ चौकात अडवून काही कार्यकर्त्यांना व्हॅनमध्येही काेंबले. मात्र काही कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनावर चालून जाण्याचा प्रयत्न केला.
शिवसेना भवनात त्यावेळी विभागप्रमुख आमदार सदा सरवणकर यांच्यासह शशी पडते, राजू पाटणकर, प्रकाश आचरेकर, राजेंद्र सूर्यवंशी, अजित कदम, यशवंत विचले, प्रकाश पाटणकर आणि शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. महिला आघाडीच्या कार्यकर्त्याही होत्या. शिवसेना भवनाच्या दिशेने येणाऱया भाजप कार्यकर्त्यांना मग शिवसैनिकांनी चांगलाच ‘शिवप्रसाद’ दिला. महिला विभाग संघटक नगरसेविका श्रद्धा जाधव यांच्यासह शिवसेनेच्या आरती किनरे, दीपाली साने, वैशाली पाटणकर, रेखा देवकर, शर्मिला नाईक, अरुंधती चारी यांच्यासह अनेक रणरागिणीही यावेळी रस्त्यावर उतरल्या होत्या. शिवसैनिकांचे रौद्ररूप पाहून अनेक भाजप कार्यकर्त्यांनी तेथून पळ काढला, पण काही उत्साही कार्यकर्त्यांना मात्र चांगलाच चोप मिळाला.
शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजप आमदार अॅड. आशीष शेलार यांनी त्वरित माहीम पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली. पोलिसांनी निष्पक्षपणे काम करावे. शिवसैनिकांवर गुन्हा दाखल केला नाही तर आंदोलन अधिक वाढेल. शिवसैनिकांना यापुढे त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. त्यांना प्रत्युत्तर देताना शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी बजावले, भाजपने हे प्रकार थांबवले नाहीत तर शिवसैनिक दिल्लीत घुसतील. दिल्लीत भाजपचे मुख्यालय आहे आणि तेथे जाऊन काय करायचे हे देखील शिवसैनिकांना चांगलेच ठाऊक आहे. असा आवाजच सत्तार यांनी शेलार यांना दिला आहे. विभागप्रमुख आमदार सुनील प्रभू यांनीही भाजपने शिवसेनेच्या वाटय़ाला जाऊ नये असा इशारा दिला आहे. जशास तसे चोख उत्तर मिळेल हे लक्षात ठेवावे. असेही प्रभू म्हणाले.
भाजपचा केंद्रीय गृहमंत्र्यांवरच अविश्वास
यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार राहुल शेवाळे म्हणाले की, शिवसेना भवन हे आमचे श्रद्धास्थान आहे. आमच्या या श्रद्धास्थानाकडे वाकडी नजर कोणीही शिवसैनिक खपवून घेणार नाही. मुळात राममंदिर हा केवळ भाजपचा विषय नसून देशभरातील जनतेच्या भावनेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. राममंदिर जमीन खरेदी प्रकरणात काही गैरव्यवहार झालाच असेल तर त्याची चौकशी व्हायलाच हवी. गृहमंत्री अमित शहा यांनीही अहवाल मागविला आहे. हा अहवाल जनतेसमोर येण्याआधीच भाजपने सुरू केलेली आंदोलने म्हणजे त्यांनी खुद्द गृहमंत्र्यांवर दाखविलेला अविश्वास आहे, असे ते म्हणाले.
महिलांवर हल्ला हा भाजपचा कांगावा
शिवसैनिकांनी महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप भाजपने केला आहे. मात्र शिवसैनिकांनी कोणत्याही महिलेवर हल्ला केलेला नाही, असे आमदार सदा सरवणकर यांनी स्पष्ट केले. ‘भाजपचे कार्यकर्ते दगड-विटा घेऊन हल्ला करण्यासाठी शिवसेना भवनाकडे निघाले असल्याची माहिती मिळाली तेव्हा शिवसेना भवनातून शिवसैनिक खाली उतरले. शिवसेना भवनावर हल्ला करण्याची भाजपची योजना होती. त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले. शिवसैनिकांनी भाजप कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा बाचाबाची झाली.’ असे सदा सरवणकर यांनी स्पष्ट केले.
दादरमध्ये तणाव, बंदोबस्त वाढवला
शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमधील या जोरदार राडय़ानंतर दादरमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता. शिवाजी पार्क परिसरातील वाहतूकही ठप्प झाली होती. पोलिसांनी वेळीच या धुमश्चक्रीवर नियंत्रण मिळवले. गोंधळ घालणाऱया भाजप कार्यकर्त्यांना पकडून पोलिसांनी माहीम पोलीस ठाण्यात नेले. तिथे आवश्यक कार्यवाहीनंतर त्यांना सोडून देण्यात आले. दरम्यान, शिवसेना भवन आणि दादर परिसरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.





























































