आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी ‘अग्निसाक्षर’ मुंबईचे उद्दिष्ट्य! जनजागृती, प्रशिक्षण, संवाद, नियंत्रण, बचावाचे धडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईचा झपाट्याने औद्योगिक आणि नागरी विकास होत असताना नागरी सुविधांवर निश्चितच ताण येतो. आगीसारख्या दुर्घटना घडल्यास जागरूकता न दाखवता केवळ पळून जाणे हाच पर्याय स्विकारला जात असल्याने दुर्घटनेची तीव्रता वाढते. त्यामुळे मुंबईकरांमध्ये जनजागृती, प्रशिक्षण, संवाद, नियंत्रण आणि बचावाचे धडे अशी ‘पंचसूत्री’ वापरून मुंबईला ‘अग्निसाक्षर’ करण्याचे उद्दिष्ट्य ठेवून काम करणार असल्याचे पालिकेचे नवनियुक्त अग्निशमन दल प्रमुख हेमंत परब यांनी ‘सामना’शी बोलताना सांगितले.

प्रश्न : आगीच्या घटना वाढण्याचे कारण काय?

उत्तर – मोठमोठ्या आस्थापनांमध्ये शेकडो जण काम करीत असताना, मोठी मालमत्ता असताना अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित ठेवण्याकडे मात्र मालक-चालकांकडून दुर्लक्ष केल्याचे अनेक दुर्घटनांनंतर निदर्शनास येते. पालिकेच्या अग्निशमन दलाकडून वेळोवेळी आस्थापना-सोसायट्यांची तपासणी करून अग्निशमन यंत्रणा नसल्यास नोटीसही दिली जाते. आगामी काळातही कारवाई आणखी तीव्र केली जाणार आहे.

प्रश्न : आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी काय करावे?

उत्तर – सोसायटी असो वा आस्थापना प्रत्येकाने आपली अग्निशमन यंत्रणा सक्षम ठेवली पाहिजे. ती वेळोवेळी तपासून घेतली पाहिजे. विशेष म्हणजे आगीच्या 80 टक्के घटना शॉर्ट सर्किटमुळे झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे इमारती-आस्थापनांच्या स्ट्रक्चरल ऑडिटसोबत वेळोवेळी इलेक्ट्रिक ऑडिट करून घेणे गरजेच आहे. यासाठी आग लागूच नये यासाठी घ्यावयाची काळजी, आगीची कारणे आणि दुष्परिणामांची माहिती अग्निशमन दलाकडून दिली जाणार आहे.

प्रश्न : लोकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी कसे काम करणार?

उत्तर – आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करून लोकांना ‘अग्निसाक्षर’ बनवण्यासाठी काम केले जाईल. यामध्ये सोसायट्या, आस्थापने, रुग्णालयांमध्ये प्रशिक्षक, मॉकड्रिल, प्रशिक्षण-प्रात्याक्षिकांचे प्रमाण वाढवले जाणार आहे. आग लागू नये म्हणून कोणती खबरदारी घ्यावी, आग लागल्यानंतर पळून न जाता शक्य होईपर्यंत स्वत: आग नियंत्रणात कशी ठेवावी, उपलब्ध फायर फायिंटग सिस्टीमचा वापर कसा करावा याबाबत जागरूकता निर्माण केली जाणार आहे.

प्रश्न : अग्निशमन दलात अत्याधुनिक यंत्रणा कोणत्या आणणार?

उत्तर – लोकांच्या जिवाचे रक्षण करणार्‍या अग्निशमन दलात पदे रिक्त राहिल्यास उपलब्ध यंत्रणेवर ताण येतो. त्यामुळे लवकरच रिक्त पदांचा आढावा घेऊन ही पदे तातडीने भरण्यात येतील. जवानांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक ‘पीपीई’ कीट दिले जाणार आहेत. दाटीवाटीच्या ठिकाणीही जाऊन बचावकार्य करता यावे यासाठी ‘बहुउपयोगी अत्याधुनिक वाहने’ घेतली जाणार आहेत.