साकीनाक्यात मायलेकाची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साकीनाक्यात मायलेकांनी इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. रेश्मा ट्रेंचिल ऊर्फ रेश्मा सरत मुलुकुटला (44), गरुड सरत मुलुकुटला अशी त्या दोघांची नावे आहेत. काही दिवसांपूर्वी रेश्माच्या पतीचे कोरोनाने निधन झाल्याने ती नैराश्यात होती. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यावरून पोलीस पुढील तपास करत आहेत.

रेश्मा ही साकीनाक्याच्या नाहर अमृत शक्ती येथील तुलिपिया अपार्टमेंटमध्ये मुलासोबत राहत होती. तिचा पती हा एका ऑनलाइन ट्रेडिंग कंपनीत कामाला होता. मे महिन्यात रेश्माच्या सासू-सासऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा रेश्माचा पती हा तेथे भेटण्यासाठी गेला होता. त्यालादेखील कोरोनाची लागण झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचारांदरम्यान रेश्माच्या पतीचादेखील काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यामुळे रेश्मा प्रचंड नैराश्यात होती. तिने काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट अपलोड केली होती.

सोमवारी रात्री रेश्मा आणि तिच्या मुलाने इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही माहिती समजताच साकीनाका पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी त्या दोघांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्या दोघांना मृत घोषित केले. त्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. रेश्माचा भाऊ परदेशात राहत असून त्याला रेश्माच्या अपघाती मृत्यूची माहिती कळवण्यात आली आहे.