
एकीकडे मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमधील कोरोनाची रूग्णसंख्या झपाट्याने कमी होत असताना बीड जिल्ह्याची रूग्णसंख्या मात्र गेल्या आठवडभरापासून घटण्याऐवजी स्थिर आहे. रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी नवीन आदेश जारी केले आहेत. यात अनेक निर्बंध लादले आहेत. विवाह करण्यापूर्वी वधू-वरांसह 50 वऱ्हाड्यांची कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे.
बीड जिल्ह्यातील कोरोनाची रूग्णसंख्या कमी होत नसल्याने अखेर महसूल प्रशासनाने ठोस पावले उचलायला सुरूवात केली आहे. पोलिसांची परवानगी न घेता विवाह सोहळे साजरे होत आहेत. या विवाह सोहळ्याला मोठी गर्दी जमत आहे. त्यातूनच कोरोना नियंत्रणात येण्याऐवजी फोफावू लागला आहे. आज जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आदेश काढून अनेक निर्बंध जारी केले आहेत. त्यात विवाह समारंभ आयोजकांनी मंगल कार्यालयाची पूर्वनोंदणी करावी, एका दिवशी एकच विवाह त्या मंगल कार्यालयामध्ये होईल, विवाह आयोजकांना मंगल कार्यालय, मॅरेज हॉल उपलब्ध न झाल्यास त्यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाची परवानगी घेऊन विवाह लावावा, स्थानिक पोलीस प्रशासनाने परवानगी देते वेळेस विवाहाला उपस्थित राहणाऱ्या 50 लोकांच्या नावाची यादी घेवून त्यांची अॅन्टिजेन टेस्ट किंवा आरटीपीसीआर तपासणीचा अहवाल घेवूनच परवानगी द्यावी.
स्थानिक पोलिसांनी जी परवानगी दिली आहे. त्या 50 लोकांची यादी पोलीस प्रशासनाच्या परवानगीचे पत्र ग्रामपंचायत किंवा नगर पालिकेमध्ये दाखल करावे असे आदेश जारी केले आहेत. विवाहाप्रसंगी प्रत्येकाला मास्क बंधनकारक असणार आहे, सॅनिटायझरचा वापर होणे आवश्यक आहे. भोजन व्यवस्थेमधील सामाजिक आंतर राखणे महत्वाचे ठरणार आहे. या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. जर अंमलबजावणी न झाल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.





























































