
धुम्रपानामुळे कोरोना होतो, असा तर्क लावत विडी विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याविरोधात सोलापुरात हजारो महिला विडी कामगारांनी रोजगार बचावासाठी एल्गार पुकारला आहे. बुधवारी जिल्हा परिषद मुख्यालयासमोरील उपोषणस्थळी 10 हजारांपेक्षा अधिक महिलांची गर्दी दिसून आली. माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
धूम्रपानामुळे कोरोना होत आहे, असा तर्क लावत स्नेहा मार्जाडी यांनी मुंबई उच्च न्यायालयात विडी विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात यावी म्हणून 20 एप्रिल 2021 रोजी जनहित याचिका दाखल केली असून, यावर पाचवेळा सुनावणी झाली आहे. 25 जून रोजी मुख्य न्यायाधीश अंतिम आदेश देणार आहेत. याबाबत 24 जूनपर्यंत राज्य सरकारची बाजू ऐकण्याची वेळ न्यायालयाने दिली आहे.
राज्यातील साडेतीन लाख विडी कामगारांचा रोजगार वाचविण्यासाठी कामगारांची बाजू मांडली पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी सिटूच्या वतीने कामगार नेते आडम मास्तर यांच्या नेतृत्काखाली राज्य महासचिक ऍड. एम. एच. शेख, नगरसेविका कामिनी आडम, युसूफ मेजर, नसीमा शेख, सुनंदा बल्ला, सिद्धप्पा कलशेट्टी, अनिल कासम, अकिल शेख यांच्या उपस्थितीत 10 हजार विडी कामगार महिलांनी ठिय्या
आंदोलन केले.






















































