सेमी हायस्पीड ट्रेनसाठी सोलापूर जिल्ह्यातील 312 हेक्टर जमीन देणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई ते हैदराबाद या श्रीक्षेत्र अक्कलकोटमार्गे प्रस्तावित सेमी हायस्पीड रेल्वेच्या 670 किलोमीटर मार्गाच्या हवाई सर्वेक्षणाचे 50 टक्के काम झाले आहे. कोरोना आणि ढगाळ वातावरणामुळे हवाई सर्वेक्षणास वेळ लागत असून, हे काम आता ऑक्टोबरनंतर सुरू केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी जिह्यातील 312 हेक्टर जमीन संपादित केली जाणार असून, यामध्ये अक्कलकोट तालुक्यातील 46.92 हेक्टर जमिनीचा समावेश असणार असल्याचे मोनार्च सर्व्हेअर ऍण्ड इंजिनीअरिंग कन्सल्टंट, पुणे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

मुंबई ते हैदराबाद हा सेमी हायस्पीड ट्रेनचा मार्ग सोलापूर जिह्यातून जात असून, त्यासाठी जिह्यातील 312 हेक्टर जमीन बाधित होणार आहे. यामध्ये अक्कलकोट तालुका 46.92 हेक्टर, दक्षिण सोलापूर 65.45, मोहोळ 38.25, पंढरपूर 86.581, माळशिरस 74.63 हेक्टर जमीन जाणार आहे. हा मार्ग श्रीक्षेत्र अक्कलकोटमार्गे जात असल्याने रेल्वे मंत्रालय, रेल्वे महामंडळ यांच्या चार हजार कोटी रुपयांची बचत होणार असल्याचे तज्ञ अभ्यासकांकडून सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रात मुंबई ते अहमदाबाद, मुंबई ते नागपूर, मुंबई ते हैदराबाद या तिन्ही मार्गांसाठी विविध स्तरांवरील कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मुंबई ते हैदराबाद या सेमी हायस्पीड ट्रेनचा मार्ग अक्कलकोटमार्गे गेल्याने सुमारे 25 किलोमीटर अंतर कमी होऊन हजारो कोटींची बचत होणार आहे. सोलापूर जिह्यातील पाच तालुक्यांतून ही ट्रेन जाणार असून, याकरिता 312 हेक्टर जमीन या मार्गासाठी संपादित होणार आहे. जिह्यातील 65 गावांचा यामध्ये समावेश आहे. संपादित होणाऱया क्षेत्रामध्ये खासगी, वनक्षेत्र, शासकीय जमिनीचा समावेश आहे.

2022मध्ये काम सुरू होण्याची शक्यता

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, लोणावळा, पुणे, बारामती, अकलूज, पंढरपूर, सोलापूर, अक्कलकोट, तांडूर, विकाराबाद, हैदराबाद असा हा मार्ग असणार आहे. या मार्गाचे सर्वेक्षण लवकरच पूर्ण होऊन हा प्रकल्प अहवाल रेल्वे बोर्डाकडे सादर केला जाणार असून, या प्रकल्पाचे काम 2022मध्ये सुरू होईल, असे सांगण्यात येत आहे.

हवाई सर्वेक्षणाचे 50 टक्के काम पूर्ण

सध्या राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाकडून देशभरात रस्ते होत असताना, यामध्ये तीर्थक्षेत्र ते तीर्थक्षेत्रांना जोणाऱया रस्त्यांना प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. तसाच प्राधान्यक्रम सेमी हायस्पीड ट्रेन प्रकल्पासाठी देण्यात आलेला आहे. नॅशनल हायस्पीड कॉर्पोरेशन लिमिटेड, ‘एचएसआरसीएएल’कडून मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेन या प्रकल्पासाठी हवाई लीडर, लाइट डिटेक्शन ऍण्ड सर्व्हे सुरू केलेला होता. याचे काम 50 टक्के झालेले आहे. मात्र, उर्वरित काम हे येत्या ऑक्टोबर 2021नंतर केले जाणार असल्याचे सर्व्हेअरकडून सांगण्यात आले आहे.