पैसे नको फक्त मोबाईल हवाय…. पुण्यातील चोरट्यांचा असाही प्रामणिकप्रणा चर्चेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पैशांसाठी चोर कोणत्याही थराला जात असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. मात्र, फक्त मोबाईलसाठी दोन चोरट्यांनी नागरिकांची रक्कमही नाकारली आहे. त्यामुळे पुण्यातील अटक केलेल्या दोन प्रामाणिक चोरट्यांची चर्चा सुरू आहे. प्रवाशी असल्याचे नाटक रचून रिक्षाचालकांना हडपसरमधील काळेपडळ परिसरात नेऊन कोयत्याचा धाक दाखवून फक्त मोबाईल चोरणाऱ्या दोघांना वानवडी पोलिसांनी अटक केली. शादाब युसूफ अन्सारी (वय 19, रा. सय्यदनगर, हडपसर) आणि फैय्याज अन्सारी (रा. उरळी देवाची ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

शहरातील हडपसर परिसरात रिक्षाचालकांना प्रवाशी असल्याचे भासवून निर्जनस्थळी नेऊन मोबाईल चोरी केल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यापार्श्वभूमीवर वानवडी पोलिसांकडून मोबाईल चोरट्यांचा शोध घेतला जात होता. त्यावेळी दीपक भोईर यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी शादाब अन्सारी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील माहितीनुसार पोलिसांनी फैय्याजला ताब्यात घेऊन दोन मोबाईल आणि एक कोयता असा 30 हजारांचा ऐवज जप्त केला. आरोपी शादाब भाजीपाला विक्री करतो, त्याचा साथीदार फैय्याज कॅटरिंग व्यवसायात काम करत असल्याचे सांगितले आहे.

मोबाईलसाठी रिक्षाचालकांना कोयत्याचा धाक दाखवून लुट करीत असल्याची कबुली त्यांनी दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड, पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, एपीआय जयवंत जाधव, संतोष तानवडे, अमजद पठाण, संजय बागल, सागर जगदाळे, अमित चिव्हे, गणेश खरात, दीपक भोईर, संजय बागल, रासगे, नाईक, देवीकर, गायकवाड यांच्या पथकाने केली.