
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया सातही तलाव क्षेत्रात सध्या समाधानकारक पाऊस पडत असून पाणीसाठा दररोज वाढत आहे. गेल्या सहा दिवसांत पाणीसाठय़ात 38180 दशलक्ष लिटरने वाढ झाली आहे. म्हणजेच सहा दिवसांत दहा दिवसांचे पाणी जमा झाले आहे. दरम्यान, सातही तलावांत मिळून सद्यस्थितीत 224894 दशलक्ष लिटर पाणी जमा झाले आहे. हे पाणी पुढील दोन महिन्यांना पुरणारे आहे.
मुंबईला अप्पर वैतरणा, तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात तलावांमधून दररोज 3 हजार 800 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबईला पावसाळा संपल्यावर पुढील वर्षभरासाठी सात तलावांत मिळून तब्बल 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर इतक्या पाणीपुरवठय़ाची गरज असते. 1 ऑक्टोबरला या पाणीसाठय़ाचा आढावा घेऊन वर्षभराच्या पाणीसाठय़ाचा आढावा घेतला जातो. त्यामुळे सुरुवातीच्या पावसात तलाव क्षेत्रात होणाऱया पावसाकडे मुंबईकरांची नजर असते. दरम्यान, सुरुवातीच्या पावसाने तलाव क्षेत्राला ओढ दिली असली तरी सद्यस्थितीत समाधानकारक पाऊस होत आहे. 18 जून रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत सात तलावांत मिळून एकूण 1 लाख 86 हजार 718 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. तर 24 जून रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत या तलावांमध्ये 2 लाख 24 हजार 894 दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठय़ाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या सहा दिवसांत तलावातील 38 हजार 176 दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठय़ाची वाढ झाली.
24 जून रोजीचा पाणीसाठा
- तलाव पाणी दशलक्ष लिटर पाऊस (मिमी)
- मोडक सागर 49,731 445.00
- तानसा 38539 427.00
- मध्य वैतरणा 27666 333.00
- भातसा 85862 327.00
- विहार 17195 925.0
- तुळशी 5901 1424.00
- एकूण 224894 दशलक्ष लिटर






























































