
मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात आज सकाळी दरड कोसळल्याने महामार्गावरील भोस्ते घाटातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रस्त्यावर उतरून कोसळलेली दरड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तासभर वाहतूक खोळंबली होती.
दरड कोसळून एक तास झाला तरीसुद्धा आपत्ती व्यवस्थापन किंवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीची यंत्रणा घटनास्थळी पोहोचली नव्हती. कालपासून कोकणात पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गुरुवारी दिवसभरात खेड, चिपळूण, दापोली या भागांत चांगलाच पाऊस झाला. त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यावर दरड कोसळणे, वृक्ष उन्मळून पडणे अशा घटना घडल्या.
आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील भोस्ते घाटात दरडीचा काही भाग कोसळून रस्त्यावर आला. त्यामुळे भोस्ते घाटातील एका बाजूची वाहतूक ठप्प झाली. सुरुवातीला रस्त्यावर वाहून आलेली माती महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी आणि वाहनचालक यांनी बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला, मात्र पुन्हा मोठमोठे दगड रस्त्यावर आले आणि रस्त्याची एक बाजू वाहतुकीस बंद झाली. ही दुर्घटना घडून तासभर उलटून गेला तरी तालुका आपत्ती व्यवस्थापन किंवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदर कंपनीची आपत्ती निवारण यंत्रणा घटनास्थळी फिरकली नाही. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसत होत्या.




























































